मुंबई : जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एलपीजी वाहतूक जहाज ‘सह्याद्री’ हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दाखल झाले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत हे जहाज खरेदी करण्यात आले असून त्याची ८२ हजार टन एलपीजी वहन करण्याची क्षमता आहे.
भारतीय नौकानयन महामंडळ म्हणजेच ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ने (एससीआय) हे जहाज खरेदी केले आहे. स्वयंपाकासह विविध उपयुक्त एलपीजी वायूची भारताची गरज ‘सह्याद्री’च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे.
भारताला एकूण मागणीच्या ९८ टक्के एलपीजी वायूची आयात करावी लागते. त्यामुळे ही आयात सर्वाधिक स्वस्त असलेल्या समुद्रमार्गेच करण्याचा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा आग्रह आहे. त्यानुसार ही जबाबदारी ‘एससीआय’वर सोपवण्यात आली असून त्यादृष्टीने कंपनीने विदेशातून दोन मोठी जहाजे खरेदी करण्यासाठी करार केला होता. ‘सह्याद्री’ हे त्यातील पहिले जहाज असून ते मुंबई बंदरात दाखल झाले आहे.
‘सह्याद्री’ची एलपीजी वहन क्षमता ८२ हजार टन असल्याने अति मोठे वायुवहन जहाज (व्हीएलजीएस) म्हणून या जहाजाला ओळखले जाते. हे २२५ मीटर लांब व ३६ मीटर रुंद आणि २२ मीटर खोली असलेले जहाज आहे. अशाप्रकारे एलपीजीचे वहन करणारे जगातील सर्वात मोठे जहाज चीनकडे आहे. त्याची क्षमता ९३ हजार टन असून लांबी २३० मीटर व रुंदी ३६.६ मीटर इतकी आहे. त्यानंतर ‘सह्याद्री’ हे दुसऱ्या क्रमांकावरील जहाज आता भारताच्या ताफ्यात आले आहे. दरम्यान, ‘एससीआय’ याच श्रेणीतील ‘शिवालिक’ हे अन्य जहाज देखील लवकरच खरेदी करणार आहे.
या श्रेणीतील वाहतुकीची भारतातील जहाजांची मालकी आज अन्य देशांकडे आहे. हे जहाज मात्र भारतीय कंपनीच्या मालकीचे असणे ही जागतिक पटलावरील महत्त्वाची बाब ठरणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत या दोन जहाजांची खरेदी होत असून ‘सह्याद्री’ची खरेदी स्वातंत्र्यदिनी झाली आहे, असे केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.