

सौदी अरेबियात उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस एका डिझेल टँकरला धडकल्याने भीषण अपघात झाला असून यात किमान ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. डिझेल टँकरला धडकल्यानंतर काही क्षणांतच बसने पेट घेतल्याचे समजते. ही घटना भारतीय वेळेनुसार पहाटे १:३० वाजता मक्काहून मदीनाला जात असताना घडली.
झोपेतच होते प्रवासी, बहुतांश लोक हैदराबादचे
माहितीनुसार, बसमधील बहुतेक प्रवासी हैदराबादचे होते. उमराह करून ते मक्काहून परतत होते. अपघातावेळी बहुतांश प्रवासी झोपेतच होते. त्यामुळे अनेकांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. बस टँकरवर आदळताच मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच बसला आग लागली. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. अपघातावेळी बसमध्ये किमान २० महिला आणि ११ मुले प्रवास करत होती, अशी प्राथमिक माहिती आहे.
मृतदेह लवकरात लवकर भारतात आणावे
हैदराबादचे खासदार आणि AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या भीषण अपघाताबाबत शोक व्यक्त केला असून केंद्र सरकारने मृतांचे पार्थिव जलदगतीने भारतात आणण्याची विनंती केली आहे. रियाधमधील भारतीय दूतावासातील उपप्रमुख अबू माथेन जॉर्ज यांच्याशी बोलणे झाले आहे. तसेच, हैदराबादमधील दोन ट्रॅव्हल एजन्सींशी संपर्क साधला आणि प्रवाशांची माहिती रियाध दूतावास आणि परराष्ट्र सचिवांना दिली आहे, असे ओवेसी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. यावेळी, "माझ्या माहितीप्रमाणे या भीषण अपघातात केवळ एकच जण बचावल्याचे मला समजले आहे, पण अद्याप निश्चित माहिती नाही" असेही ते म्हणाले.
भारतीय दूतावासाने जारी केले हेल्पलाईन क्रमांक
रशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. “रियाध आणि जेद्दा येथील भारतीय दूतावासातील पथकं प्रभावित कुटुंबांना शक्य तेवढी मदत करत आहेत, जखमींनी लवकर बरे व्हावे ही प्रार्थना करतो,” असे ते म्हणाले. केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. "सौदी अरेबियातील मदीना-मक्का महामार्गावरील बस अपघाताची घटना दुर्देवी आणि धक्कादायक आहे. आम्ही आमच्या दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असून ते घटनेबाबतची अधिक माहिती गोळा करत आहेत, तसेच सर्व आवश्यक मदत करत आहेत." असे रिजिजू म्हणाले.
सौदीतील भारतीय दूतावासाने पीडितांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत:
• ८००२२४०००३ (टोल फ्री)
• ०१२२६१४०९३
• ०१२६६१४२७६
• ०५५६१२२३०१ (व्हॉट्सअॅप)
जेद्दा भारतीय वाणिज्य दूतावासाचे निवेदन
“मदिनाजवळ उमराह यात्रेकरूंच्या बसचा झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर जेद्दा वाणिज्य दूतावासात २४x७ नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. आपल्या जीवलग नातलगांना गमावणाऱ्या कुटुंबांप्रती आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो,” असे निवेदनात म्हटले. “रियाध दूतावास व जेद्दा वाणिज्य दूतावास सौदी हज आणि उमराह मंत्रालयाशी तसेच स्थानिक अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. संबंधित उमराह ऑपरेटरशीही संवाद सुरू आहे. दूतावासातील कर्मचारी आणि भारतीय समुदायाच्या स्वयंसेवकांची एक टीम देखील विविध रुग्णालयांत व घटनास्थळी कार्यरत आहे,” असे दूतावासाने सांगितले.
तेलंगणा सरकारची प्रतिक्रिया
तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. स्थानिक माध्यमांनी अपघातात भारतीय उमराह यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिल्यापासून तेलंगणा सरकार रियाधमधील भारतीय दूतावासाशी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने दिलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आणि दूतावास अधिकाऱ्यांशी जवळून समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. बसमध्ये हैदराबादमधील अनेक प्रवासी असल्याची माहिती तेलंगणा CMO ने दिली.
तेलंगणा सरकारचे हेल्पलाईन क्रमांक
• +९१ ७९९७९ ५९७५४
• +९१ ९९१२९ १९५४५
दरम्यान, अपघातात बस जळून खाक झाल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे कठीण जात आहे.