
नेपाळची राजधानी काठमांडू येथे आज एक मोठा विमान अपघात झाला. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा विमान अपघात झाला. या विमानात १९ जण होते, त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त सौर्य एअरलाइन्सचे विमान इंजिन चाचणीसाठी पोखरा येथे जात होते. नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमानातील लोक इंजिनियर आणि टेक्निशियन होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी काठमांडू विमानतळावर झालेल्या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सर्व मृतदेह सौर्य एअरलाइन्सचे इंजिनियर आणि कर्मचारी असल्याची ओळख पटली आहे. काठमांडू विमानतळाचे प्रमुख प्रेमनाथ ठाकूर यांनी याला दुजोरा दिला आहे. काठमांडूहून पोखराकडे जाणाऱ्या सौर्य एअरलाइन्सच्या विमानात एकूण १९ लोक होते, ज्यात दोन कॅप्टन, दोन क्रू सदस्य आणि १५ प्रवासी होते. नेपाळच्या विमानतळ प्राधिकरणाचे माहिती अधिकारी ज्ञानेंद्र भुल्का यांनी याला दुजोरा दिला आहे.
सौर्य एअरलाइन्सचे विमान १९ जणांसह पोखरा येथे जात असताना टेक ऑफ करताना अपघात झाला. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विमानाला आग लागून विमानतळावर धुराचे लोट उठताना दिसत आहे.
विमान कसे कोसळले?
प्राथमिक माहितीनुसार, टेक ऑफ दरम्यान विमान घसरल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. विमानातील आग लवकरात लवकर विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले जेणेकरून इतर प्रवाशांना शोधता येईल.
विमानाचा कॅप्टन बचावला:
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते प्रेमनाथ ठाकूर यांनी सांगितले की, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सौरी एअरलाइन्सचे पोखराला जाणारे विमान धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच कोसळले. नेपाळ पोलीस आणि नेपाळी लष्करासह अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचारी बचावकार्य करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील कॅप्टन मनीष शाक्य यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी सिनामंगल येथील केएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.