वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी त्यांचे निकटवर्तीय आणि व्हाईट हाऊसचे पर्सनल डायरेक्टर सर्जिओ गोर यांची भारतातील पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. यासोबतच त्यांच्यावर दक्षिण आणि मध्य आशियाई घडामोडींसाठी विशेष दूत म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गोर हे ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.
ट्रम्प यांनी 'टूथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, मी सर्जिओ गोर यांना भारताचे पुढील राजदूत आणि दक्षिण व मध्य आशियाई घडामोडींसाठी विशेष दूत म्हणून बढती देत आहे. सर्जिओ आणि त्यांच्या टीमने विक्रमी वेळेत आपल्या संघीय सरकारच्या प्रत्येक विभागात जवळपास ४,००० 'अमेरिका फर्स्ट' विचारांच्या देशभक्तांची नियुक्ती केली आहे.