टोकियो : नववर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या सायंकाळी भूकंपांच्या मालिकांनी जपान हादरला. इशिकावा आणि आसपासच्या परिसराला एकामागून एक २१ भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे जपानच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा देण्यात आला. त्यानुसार निगाटा आणि टोयामा प्रांताच्या किनारपट्टीला त्सुनामीचा फटका बसला. जवळपास १ मीटर उंचीच्या लाटा किनाऱ्याला धडकल्या. अजून जास्त तीव्रतेच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. सर्वात मोठा धक्का ७.४ इतक्या तीव्रतेचा होता. या भूकंपामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून भूकंपग्रस्त भागात रेल्वे सेवा बंद झाली आहे. स्तुनामीचा इशारा दिलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. या भूकंपात अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र, मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
राजधानी टोकियो आणि कांटो या भागांना भूकंपाचे धक्के जाणवले. जपान सरकारने त्सुनामीचा इशारा दिला असून किनारपट्टी भागात ५ मीटर इतक्या उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. जपानच्या किनारपट्टीवर भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या ३०० किलोमीटर परिसरात धोकादायक त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता हवाई स्थित पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने वर्तवली आहे.
इशिकावा प्रांतातील वाजिमा शहराच्या किनारपट्टीला १ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा धडकल्या आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागातील लोकांना तातडीने अन्य ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी उंच ठिकाणी जावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. जपानच्या नाटो क्षेत्रात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ११ भूकंपाचे धक्के नोंदवण्यात आले. गेल्या काही वर्षांत जपानमध्ये आलेला हा सर्वात मोठा भूकंप आहे. जपानमध्ये झालेल्या भूकंपामुळे उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांसह रशियाच्या किनारपट्टीला त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कोरियाच्या काही भागात समुद्रात १ मीटरपर्यंत लाटा उसळल्या होत्या.
फुकुशिमा प्लांटवर करडी नजर
जपानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, फुकुशिमा अणु प्रकल्पावर सरकारची करडी नजर आहे. मार्च २०११ मध्ये जपानमध्ये ९ रिश्चर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी आली होती. त्यानंतर निर्माण झालेल्या त्सुनामीच्या लाटांनी फुकुशिमा अणु प्रकल्प उद्ध्वस्त केला होता. आता भूकंपानंतर आण्विक प्रकल्पाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही ना, याची तपासणी केंद्राचे संचालक टेपको करत आहेत.
जपान रिंग ऑफ फायरवर
जपान भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील भागात आहे. येथे भूकंप होतच राहतात, कारण ते दोन टेक्टोनिक प्लेट्सच्या संगमाजवळ आहे. इशिकावा प्रीफेक्चर, जिथे भूकंप झाला, ते रिंग ऑफ फायरच्या अगदी जवळ आहे. समुद्राभोवती भूकंपाच्या फॉल्ट लाइनची घोड्याच्या नालेच्या आकाराची मालिका आहे. रिंग ऑफ फायर हे असे क्षेत्र आहे, जेथे महासागरीय टेक्टोनिक प्लेट्स कॉन्टिनेंटल प्लेट्ससह अस्तित्वात आहेत. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, तेव्हा भूकंप होतो. जगातील ९० टक्के भूकंप या रिंग ऑफ फायरमध्ये होतात. हे क्षेत्र ४० हजार किलोमीटरमध्ये पसरले आहे. रिंग ऑफ फायरवर जपानसह रशिया, फिलीपिन्स, इंडोनेशिया, न्यूझीलंड, अंटार्क्टिका, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, कोस्टा रिका, पेरू, इक्वेडोर, चिली, बोलिव्हिया हे १५ देश आहेत.
त्सुनामीचा भारताला धोका नाही
जपानमधील या त्सुनामीचा भारताला कोणताही धोका नसल्याचे हैदराबादमधील इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या संस्थेने म्हटले आहे. इंडियन त्सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटरने सांगितले की, भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२.२० वाजता जपानमधील होन्शुच्या पश्चिम किनाऱ्याजवळ ७.५ रिश्चर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. मात्र, यामुळे भारताला त्सुनामीचा धोका नाही.