शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार; प्रवासाची व्यवस्था करण्याचे सरकारला आवाहन

बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी १६ डिसेंबर रोजी मायदेशी परतण्याची योजना आखली आहे. बांगलादेशचा विजय दिवस असलेल्या या दिवशी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.
शेख हसीना १६ डिसेंबरला बांगलादेशात परतणार; प्रवासाची व्यवस्था करण्याचे सरकारला आवाहन
Published on: 

ढाका : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी १६ डिसेंबर रोजी मायदेशी परतण्याची योजना आखली आहे. बांगलादेशचा विजय दिवस असलेल्या या दिवशी पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.

विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील जनआंदोलनामुळे ५ ऑगस्ट २०२४ रोजी हसीना यांना १५ वर्षांची सत्ता सोडावी लागली आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. आंदोलनादरम्यान शेकडो आंदोलकांच्या मृत्यूशी संबंधित मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी त्यांना अनुपस्थितीत मृत्युदंड सुनावण्यात आला. हसीना यांनी हा निकाल फेटाळून मायदेशी परतल्यानंतर खटल्याला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे.

विमानाची व्यवस्था

मायदेशी परतण्याच्या नियोजित तारखेची घोषणा करताना त्यांनी पंतप्रधान तारिक रहमान यांना राष्ट्रीय विमानसेवेच्या विमानातून दिल्लीहून ढाका येथे परतण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले. हसीना यांच्या सहायक अबू ओबैधा अरिन यांनी १६ डिसेंबरला मायदेशी परतण्याचा निर्णय प्रतीकात्मक असल्याचे सांगितले. विजय दिवस त्या आपल्या जनतेसोबत साजरा करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हसीना यांनी यापूर्वी डिसेंबरमध्ये कोणत्याही परिस्थितीत परतणार असल्याचे म्हटले होते.

हसीनांना बेड्या घालूनच बांगलादेशात आणता येईल : कोबीर

शेख हसीना यांना बांगलादेशात परत आणायचे झाल्यास बेड्य‌ा घालून किंवा कडक निगराणीखालीच आणावे लागेल, असे परराष्ट्र राज्यमंत्री हुमायुन कोबीर यांनी म्हटले आहे. हसीना ५ ऑगस्ट २०२४ पासून भारतात आहेत. बांगलादेशने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांप्रकरणी नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना अनुपस्थितीत मृत्युदंड सुनावण्यात आला होता. मात्र, त्यांनी आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या परतीच्या मुद्द्यावरून भारत-बांगलादेश संबंधांत तणाव निर्माण झाला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)