

रिओ डी जनेरियो : नामवंत गायक आणि संगीतकार ऑलिव्हर ट्री यांचा ब्राझीलमध्ये झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.
याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रिओ डी जनेरियो येथे घडला. आकाशात दोन हेलिकॉप्टरची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही हेलिकॉप्टर हवेतच पेटले आणि खाली कोसळले. या दुर्घटनेत गायक ऑलिव्हर ट्री यांच्यासह इतर पाच जणांचाही मृत्यू झाला आहे.
संगीत क्षेत्रातील मोठी हानी
ऑलिव्हर ट्री हे त्यांच्या आगळ्यावेगळ्या संगीत शैलीसाठी ओळखले जात होते. अल्टरनेटिव्ह संगीताला पॉप आणि इलेक्ट्रॉनिक संगीताची जोड देण्यात त्यांचा हातखंडा होता. ऑलिव्हर ट्री यांनी नुकताच ६ जून रोजी ‘साओ पावलो’ येथे यशस्वी कार्यक्रम सादर केला होता. त्यानंतर १ जुलै रोजी लिस्बन (पोर्तुगाल) येथे त्यांच्या मैफिलीचे नियोजन होते. याव्यतिरिक्त स्पेन, ऑस्ट्रिया, अमेरिका आणि चीनमध्येही त्यांच्या संगीत मैफिलींचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे जागतिक संगीत चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्री यांचे नाव जागतिक पातळीवर आदराने घेतले जात होते.
प्रशासनाकडून चौकशी सुरू
स्थानिक प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तातडीने तपास सुरू केला आहे. तांत्रिक बिघाडामुळे ही धडक झाली की मानवी चूक, हे तपास अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.