
बीजिंग : चीनमध्ये सोमवारी एका व्यक्तीने लहान मुलांच्या शाळेजवळ केलेल्या चाकूहल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला.
चीनच्या आग्नेयेकडील ग्वांगडाँग प्रांतातील लिआनजियांग शहरात ही घटना घडली. एका २५ वर्षीय व्यक्तीने सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास शाळेजवळ गर्दीत घुसून लोकांवर अचानक चाकूने हल्ला केला. त्यात सहा जण मारले गेले आणि एक जखमी झाला. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. चीनच्या दाफेंग न्यूज या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोराच्या मुलाला काही दिवसांपूर्वी याच भागात एका कारने धडक दिली होती. कदाचित त्याचा सूड घेण्याच्या हेतूने त्याने हा हल्ला केला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. धडक देणाऱ्या कारचा मालक या हल्ल्यात मारला गेला आहे. त्याशिवाय मृतांमध्ये जवळच्या शाळेतील एका शिक्षकाचाही समावेश आहे.