
जगात आजघडीला सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया साईट ट्विटरची मालकी टेस्लाचे मालक एलन मस्क यांच्याकडे गेली आहे. मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्स मोजून ट्विटर ताब्यात घेतले आहे. त्यांनी प्रति शेअर ५४.२० डॉलर्स मोजले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून ट्विटरवर मस्क ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मस्क यांनी ट्विटर खरेदीसाठी ४३ अब्ज डॉलर्सच्या रोख व्यवहाराची ऑफर दिली होती. ही ऑफर ट्विटरने ‘सर्वोत्तम व अंतिम’ असल्याचे जाहीर केले होते. सोमवारी हा व्यवहार पूर्ण झाला आहे.
मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते व्यक्तिश: ट्विटर खरेदीसाठी चर्चा करत आहेत. त्यात टेस्लाला सहभागी केलेले नाही. मस्क म्हणाले की, “ट्विटरला वाढीला अधिक संधी आहेत. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे खरे प्रतीक आहे.” मस्क म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहण्यासाठी हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म खरेदी केला आहे. वापरकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज असून, त्यांना अधिकाधिक चांगली सेवा देणे गरजेचे आहे.”
दरम्यान, ट्विटर विक्रीनंतर आता खासगी कंपनी झाली आहे. ट्विटरने संपूर्ण जगावर परिणाम केला आहे. “आम्हाला आमच्या पूर्ण टीमबद्दल अभिमान आहे,” असे कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांनी सांगितले.