सौरज्वालांमुळे अमेरिकेत दूरसंचारात व्यत्यय- १७ डिसेंबरला सौरवादळाची शक्यता

सूर्यामधून बाहेर पडणाऱ्या ज्वाला किंवा वादळांची वर्गवारी त्यांच्या ताकदीनुसार केली जाते. त्यात बी वर्गातील ज्वाला सर्वात कमी क्षमतेच्या असतात
सौरज्वालांमुळे अमेरिकेत दूरसंचारात व्यत्यय- १७ डिसेंबरला सौरवादळाची शक्यता
PM

वॉशिंग्टन : सूर्यामधून शुक्रवारी मोठ्या प्रमाणात ज्वाला (सोलर फ्लेअर्स) बाहेर पडल्या असून त्यामुळे अमेरिकेत काही काळासाठी विमानांच्या संदेशवहनात आणि अन्य दूरसंचार उपकरणांत व्यत्यय निर्माण झाला. या सौरज्वालांपाठोपाठ १७ डिसेंबरला सौरवादळाची शक्यता असून त्याने आणखी मोठ्या प्रमाणात दूरसंचार यंत्रणेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूर्याच्या बाहेरील आवरणातून अनेक वेळा ज्वाला बाहेर पडत असतात. साधारण दर ११ वर्षांनी त्यात वाढ होत असते. त्यानुसार २०२४ वर्षात या प्रकारांमध्ये वाढ होण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. शुक्रवारी सूर्याच्या पृष्ठभागातून अशाच प्रकारची मोठी ज्वाला बाहेर पडली. साधारणपणे सौरज्वालांपाठोपाठ सूर्याच्या बाहेरील आवरणातून काही द्रव्यही बाहेर पडते. त्याला कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) म्हणतात. त्यामुळे मोठी सौरवादळे (सोलर स्टॉर्म्स) घडतात. या सर्व प्रकारांमुळे पृथ्वीच्या वातावरणातही बरेच परिणाम दिसून येतात. त्याने कृत्रिम उपग्रह आणि विमानांशी संपर्क यंत्रणेत बिघाड होऊ शकतो. हा परिणाम काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंत कायम राहू शकतो.

सूर्यामधून बाहेर पडणाऱ्या ज्वाला किंवा वादळांची वर्गवारी त्यांच्या ताकदीनुसार केली जाते. त्यात बी वर्गातील ज्वाला सर्वात कमी क्षमतेच्या असतात. त्यापेक्षा सी आणि एम वर्गातील ज्वाला अधिक क्षमतेच्या असतात, तर एक्स वर्गातील ज्वाला आणि वादळे सर्वाधिक घातक असतात. शास्त्रज्ञांच्या मते शुक्रवारच्या सौरज्वाला एक्स २.८ क्षमतेची होती. त्यानंतर १५ आणि १६ डिसेंबर रोजी जी-१ वर्गातील वादळ येऊ शकते. त्याची तीव्रता वाढत जाऊन १७ डिसेंबरला ती जी-३ पर्यंत जाऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in