
ऑस्टिन : अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीला मोठा धक्का बसला असून, बुधवारी टेक्सासमधील मॅसी येथील स्टारबेस चाचणी स्थळी स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचा स्फोट झाला. ‘स्टारशिप ३६’ नावाच्या या सुपर रॉकेटच्या स्थिर अग्निचाचणीदरम्यान हा स्फोट झाला. ही घटना रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी रॉकेटचे इंजिन जमिनीवर चाचणीसाठी सुरू करण्यात आले होते.
या स्फोटामुळे ‘स्टारशिप प्रोटोटाइप’चे मोठे नुकसान झाले असून, ‘स्पेसएक्स’ला सर्व प्रक्षेपण तयारी अनिश्चित काळासाठी स्थगित करावी लागली आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चाचणी सुरू झाल्यानंतर काही सेकंदांतच रॉकेटचा समोरील भाग अचानक फुटला. ज्यामुळे शक्तिशाली स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते.