ध्रुवीय प्रकाशकिरणांचा मनोहारी रंगोत्सव,सौर वादळामुळे लडाखसह जगभरात नॉर्दर्न लाइट्सचे दर्शन

पृथ्वीवर धडकलेल्या सौर वादळामुळे शनिवारी जम्मू-काश्मीरच्या लडाखसह जगातील अनेक ठिकाणी ध्रुवीय प्रकाशकिरणांचा मनोहारी रंगोत्सव अनुभवण्यास मिळाला.
ध्रुवीय प्रकाशकिरणांचा मनोहारी रंगोत्सव,सौर वादळामुळे लडाखसह जगभरात नॉर्दर्न लाइट्सचे दर्शन

नवी दिल्ली : पृथ्वीवर धडकलेल्या सौर वादळामुळे शनिवारी जम्मू-काश्मीरच्या लडाखसह जगातील अनेक ठिकाणी ध्रुवीय प्रकाशकिरणांचा मनोहारी रंगोत्सव अनुभवण्यास मिळाला. लाल, किरमिजी, हिरवट रंगाच्या किरणांनी आकाशात विविध आकार तयार करून निराळाच माहोल तयार केला. जगभरातील हौशी आकाश निरीक्षकांनी हा दुर्मिळ योग कॅमेऱ्यांत टिपून त्याचा आनंद लुटला. लडाखच्या हान्ले डार्क स्काय रिझर्व्हमधून या घटनेची नोंद करण्यात आली.

सूर्याच्या वातावरणात अनेक बदल घडत असतात. दर काही वर्षींनी सूर्यावरील घडामोडी अधिक प्रखर रूप धारण करतात. त्या काळात सूर्यातून काही द्रव्ये बाहेर फेकली जातात. त्याला सोलर फ्लेअर्स किंवा कोरोनल मास इजेक्शन्स असे म्हणतात. त्यामुळे सौर वादळे निर्माण होतात. त्याचा परिणाम खूप दूरपर्यंत पाहायला मिळतो. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या वातावरणातही अनेक बदल होतात. सध्या सूर्याच्या वातावरणातील घडामोडी वाढल्या आहेत. त्याला सोलर सायकल २५ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या वर्षभर असे अनेक परिणाम दिसून येऊ शकतात. आता सूर्याच्या एआर-१३६६४ या प्रदेशातून द्रव्य बाहेर फेकले जात आहे. त्यामुळे अनेक उच्च ऊर्जाधारित सोलर फ्लेअर्स निर्माण झाले असून त्यातील काही ८०० किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने पृथ्वीकडे प्रवास करत आहेत, अशी माहिती कोलकाता येथील सेंटर फॉर एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इन इंडिया (सीईएसएसआय) या सेस्थेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

त्याचा परिणाम म्हणून शनिवारी भारतातील लडाखसह अमेरिका, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंड, डेन्मार्क आणि पोलंड आदी देशांत आकाशात रंगांचा उत्सव पाहायला मिळाला. शनिवारी आकाशात दिसलेला रंगीत प्रकाश हा कोणताही चमत्कार नसून ती एक शास्त्रीय घटना आहे. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळच्या देशांत अशा प्रकारचा प्रकाशाचा खेळ अधूनमधून पाहायला मिळतो. त्याला अ’रोरा बोरेलिस, नॉर्दर्न किंवा सदर्न लाइट्स अशा नावांनी ओळखले जाते. आकाशातील हा रंगांचा खेळ पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक या प्रदेशांत जात असतात. आकाशातील हा रंगोत्सव प्रामुख्याने सौर वादळांमुळे पृथ्वीच्या वातारणातील मॅग्नेटोस्फिअर या पट्ट्यात काही बदल झाल्यामुळे घडून येतो. या क्षेत्रातील वातावरणातील कणांचे उष्मतेमुळे आयनीभवन होऊन त्यातून वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडतो. सामान्यत: अ’रोरा बोरेलिस, नॉर्दर्न किंवा सदर्न लाइट्स बरेच अस्थिर असतात आणि कमी काळ दिसतात. शनिवारी आकाशात दिसलेले ध्रुवीय प्रकाशकिरण (अ’रोरल लाइट्स) स्थिर होते आणि अधिक काळ दिसले. यापूर्वी ऑक्टोबर २००३ मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती, असे अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अँड अ’टमॉस्फेरिक अ’डमिनिस्ट्रेशच्या स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in