
वॉशिंग्टन : आपण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याबद्दल काळजी करण्यात कमी वेळ घालवला पाहिजे आणि आपल्या देशात येणारे स्थलांतरित, ड्रग माफिया, खुनी आणि मानसिक संस्थांमधील लोकांबद्दल काळजी करण्यात जास्त वेळ घालवला पाहिजे म्हणजेच आपण युरोपसारखे होऊ नये, अशी पोस्ट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर टाकत युरोपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या सार्वजनिक वादानंतर डोनाल्ड ट्रम्प सध्या युरोपीय नेत्यांकडून टीकेच्या भोवऱ्यात सापडले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे रशियाशी जवळीक साधत आहेत, असा आरोप युरोपियन राष्ट्रांचे नेते करत आहेत. तसेच त्यांनी झेलेन्स्की यांना समर्थन दिले आहे. आता ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत पुन्हा एकदा युरोपवर निशाणा साधला आहे.
ट्रम्प यांचा युद्धाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला असून, त्यांचे रशियाशी जवळचे संबंध असल्याचे संकेत मिळत असल्याची टीका ट्रम्प यांच्यावर केली जात आहे. अमेरिका युक्रेनला दिलेला पाठिंबा मागे घेईल, अशीही चर्चा सुरू झाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत झेलेन्स्की, ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात वादविवाद झाला. नेत्यांमधील वादानंतर वॉशिंग्टन आणि कीव्ह यांच्यातील आर्थिक करारावर स्वाक्षरी होऊ शकली नाही. व्हाइट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ म्हणाले की, व्हाइट हाऊसमधील झेलेन्स्कीचे वर्तन लज्जास्पद होते.