शुक्राणू दान करण्यासंदर्भातील नियम मोडले, ५५० मुलांचा बाप अडचणीत!

२०१७ मध्ये त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले. सध्या तो नेदरलँड्सच्या बाहेर त्याचे शुक्राणू दान करत आहे
शुक्राणू दान करण्यासंदर्भातील नियम मोडले, ५५० मुलांचा बाप अडचणीत!

एका डच संगीतकाराने आपल्या वयाच्या ४१ व्या वर्षीच तब्बल ५५० मुलांना जन्म दिला असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जगभर त्याची मुले आहेत. जोनाथन जेकब मेजर असे त्याचे नाव असून, शुक्राणूदाता अशी त्याची ओळख आहे. मात्र त्याच्या या प्रतापामुळे तो अडचणीत आला आहे. नेदरलँडच्या कायद्यानुसार शुक्राणू दान करण्यासंदर्भात काही नियम आहेत. २५ पेक्षा जास्त मुलांना जन्म देण्याची किंवा १२ पेक्षा जास्त स्त्रियांना गर्भधारणा करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्याच्या शुक्राणूंपासून मूल झालेल्या एका महिलेने त्याच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे.

द डच डोनरकाइंड फाऊंडेशनच्या अहवालानुसार, जोनाथन जेकब मेजर सध्या केनियामध्ये आहे. त्याने नेदरलँड्समधील १३ क्लीनिकमध्ये शुक्राणूंचे दान केले. ज्या माध्यमातून १०२ मुलांचा जन्म झाला. त्यामुळे २०१७ मध्ये त्याला काळ्या यादीत टाकण्यात आले. सध्या तो नेदरलँड्सच्या बाहेर त्याचे शुक्राणू दान करत आहे. आतापर्यंत जगभरातील ५५० मुलांचे आपण जैविक पिता असल्याचे त्याने जाहीर केल्यामुळे त्याच्यापासून माता बनलेल्या महिलांमध्ये खळबळ उडाली आहे.

इंटरनेटद्वारे जोनाथन जेकब मेजर हा जगभरातील आंतरराष्ट्रीय स्पर्म बँकांशी संपर्क करून शुक्राणू दानाचा व्यवसाय करतो. एका डच महिलेने २०१८ मध्ये त्याच्यापासून एका मुलाला जन्म दिला होता. या महिलेला यामुळे धक्का बसला असून, त्याच्यापासून एवढी मुले झाली असल्याचे माहीत असते तर मी कधीच या दात्याची निवड केली नसती, असे तिने म्हटले आहे.

एका ऑस्ट्रेलियन जोडप्याने डॅनिश फर्टिलिटी क्लीनिक क्रायओस इंटरनॅशनलला त्याच्या शुक्राणूंसाठी ६,५०० डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम दिली होती. तिथे त्याने रुड या टोपणनावाने आपले शुक्राणू दान केले होते. तो सांसारिक, सर्जनशील आणि अतिशय हुशार आहे, असे त्या दाम्पत्याला सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे तो त्या महिलेच्या जोडीदारासारखा दिसतो. त्यामुळे त्याची निवड केली. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या महिलेलाही धक्का बसला आहे. मला विश्वास बसत नाही की, मी माझ्या मुलाला कसे सांगावे की त्याला शेकडो भावंडे आहेत, अशी प्रतिक्रिया त्या महिलेने दिली.

दरम्यान, डोनरकाइंडचे अध्यक्ष टायस व्हॅन डर मीर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. सरकार कारवाईसाठी पुढाकार घेत नसेल तर आम्हाला पुढे यावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. जोनाथन जेकब मेजरला मात्र याविषयी काहीच वाटत नाही. टाइम्स ऑफ लंडन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, जगभरात माझी मुले आहेत हे मला बघायला आवडते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in