चीनमधून १२ हजार किमीवर यशस्वी शस्त्रक्रिया; यंत्रमानवाला सूचना देत मोरोक्कोतील रुग्णावर उपचार

चीनमध्ये फ्रान्सच्या एका डॉक्टरने १२ हजार किमी दूर मोरोक्कोत एक प्रोस्टेट कर्करुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
चीनमधून १२ हजार किमीवर यशस्वी शस्त्रक्रिया; यंत्रमानवाला सूचना देत मोरोक्कोतील रुग्णावर उपचार
एक्स @XH_Lee23
Published on

बीजिंग : चीनमध्ये फ्रान्सच्या एका डॉक्टरने १२ हजार किमी दूर मोरोक्कोत एक प्रोस्टेट कर्करुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरने शस्त्रक्रियेसाठी चीनमध्ये बनलेल्या ‘टोमाई’ या यंत्रमानवाचा वापर केला. या यंत्रमानवाच्या सहाय्याने दोन तासात शस्त्रक्रिया यशस्वी झाली. डॉ. युनेस अहलल हे चीनच्या शांघाय येथून यंत्रमानवाला सूचना देत होते. त्यानुसार त्या यंत्रमानवाने मोरोक्कोत शस्त्रक्रिया यशस्वी केली.

चीनच्या जिन्हुआ वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, चीन ते मोरोक्को हे अंतर १२ हजार किमी आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या डॉक्टरने इतकी दूरवरील शस्त्रक्रिया केली नाही. या शस्त्रक्रियेला ‘टोमाई’ यंत्रमानवाच्या मदतीने पूर्ण करण्यात आले. मोरोक्कोतील यंत्रमानवाने शांघाय येथील सर्जनच्या आदेशाचे पालन केले. त्याने प्रोस्टेट ट्यूमर काढण्याचे काम अत्यंत अचूकपणे केले. तसेच टाके लावण्याचे कामही केले. ही शस्त्रक्रिया केवळ ५ जी तंत्रज्ञानावर अवलंबून होती. तरीही व्हीडिओ अत्यंत स्पष्ट होते.

रिमोट सर्जरीचे फायदे काय?

रिमोट सर्जरीमुळे तज्ज्ञ सर्जन आपल्या रुग्णांना दूरवरूनही सेवा देऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना परदेशात जाण्याची गरज संपणार आहे. तसेच ज्येष्ठ सर्जन दूरवरून आपल्या कनिष्ठ सर्जनना मार्गदर्शनही करू शकतात. हा यंत्रमानव बनवणारी व परिचलन करणारी कंपनी ‘मायक्रोपोर्ट मेडबॉट’चे अध्यक्ष चाओ यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानामुळे भविष्यात वैद्यकीय सेवेत क्रांतीकारी बदल होणार आहेत.

आम्हाला जास्तीत जास्त रिमोट शस्त्रक्रिया दैनंदिन जीवनात आणायच्या आहेत.

‘टोमाई’ने केल्या २५० शस्त्रक्रिया

या ‘टोमाई’ यंत्रमानवाने आतापर्यंत २५० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. या यंत्रमानवाला युरोपियन महासंघाचे ‘सीई’ हे प्रमाणपत्रही मिळाले आहे. हा यंत्रमानव मूत्राशयाच्या, स्त्री व प्रसूती एंडोस्कोपी शस्त्रक्रिया करतो.

logo
marathi.freepressjournal.in