खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येप्रकरणी भारत सरकारला अमेरिकन न्यायालयाने पाठवले समन्स

समन्समध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल, ‘रॉ’चे एजंट विक्रम यादव आणि उद्योगपती निखिल गुप्ता यांच्या नावांचा समावेश आहे. येत्या २१ दिवसांत या समन्सला उत्तर देण्यास सांगितले आहे.
खलिस्तानी दहशतवादी पन्नूच्या हत्येप्रकरणी भारत सरकारला अमेरिकन न्यायालयाने पाठवले समन्स
PTI
Published on

वॉशिंग्टन : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याच्या हत्येच्या कटप्रकरणी अमेरिकन न्यायालयाने भारत सरकारला समन्स पाठवले आहे. या समन्समध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल, ‘रॉ’चे एजंट विक्रम यादव आणि उद्योगपती निखिल गुप्ता यांच्या नावांचा समावेश आहे. येत्या २१ दिवसांत या समन्सला उत्तर देण्यास सांगितले आहे.

पन्नूच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी भारतीय नागरिक निखिल गुप्ता याला ३० जून २०२३ मध्ये चेक रिपब्लिकच्या पोलिसांनी अटक केली होती. १४ जून २०२४ रोजी निखिलला अमेरिकेकडे प्रत्यार्पित करण्यात आले.

अमेरिकन न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे की, भारतीय नागरिक निखिल गुप्ता याच्यावर हत्येचा कट रचण्याचा आरोप आहे. भारताच्या माजी सीआरपीएफ अधिकाऱ्याने पन्नूच्या हत्येचा कट रचण्यास गुप्ताला सांगितले होते. यासाठी निखिलने एका व्यक्तीसोबत या कामासाठी ८३ लाख रुपये देण्याचा व्यवहार केला होता.

याप्रकरणी अमेरिकन न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने भारत सरकारसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, ‘रॉ’चे माजी प्रमुख सामंत गोयल, ‘रॉ’चे एजंट विक्रम यादव यांना समन्स बजावले आहे.

भारताने आरोप फेटाळले

याप्रकरणी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. हे प्रकरण उघड झाल्यानंतर आम्ही कारवाई केली. याप्रकरणी आम्ही उच्चस्तरीय समिती बनवली आहे. आमच्या मतामध्ये कोणताही बदल होणार नाही. हा खटला दाखल करणारी व्यक्ती स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी आहे.

logo
marathi.freepressjournal.in