काठमांडू : गेले काही दिवस अराजकतेच्या खाईत सापडलेल्या नेपाळच्या हंगामी पंतप्रधानपदी अखेर शुक्रवारी रात्री सुशीला कार्की विराजमान झाल्या. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी ‘शीतल निवास’मध्ये कार्की यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
दरम्यान, नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी संसद विसर्जित केली असून येत्या सहा महिन्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, ‘झेन-झेड’ आंदोलकांनी नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. आम्ही सरकारमध्ये सामील होणार नाही, पण सरकारच्या कामावर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
नेपाळमध्ये सत्तापालटानंतर तीन दिवसांनी लष्कर, राष्ट्रपती व ‘झेन-झी’ यांच्यातील चर्चेनंतर कार्की यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्की यांनी नेपाळच्या पहिल्या महिल्या सरन्यायाधीश म्हणून काम केले आहे. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
राष्ट्रपती पौडेल यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून कार्कींची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते, कायदा तज्ज्ञ आणि नागरी समाजातील नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
दरम्यान, या शपथविधीनंतर नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव यांनी शपथविधी समारंभात सुशीला कार्की यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
हिंसाचारातील मृतांचा आकडा ५१ वर
दरम्यान, नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात भारतीय पत्रकारांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. तसेच नेपाळमधील हिंसाचारात आतापर्यंत ५१ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.