

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये शनिवारी एका संशयिताने व्हाईट हाऊसजवळ सुमारे ३० गोळ्या झाडल्या. या घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्येच होते. याबाबतच्या वृत्तानुसार, या संशयित हल्लेखोराने व्हाईट हाऊसच्या सुरक्षा तपासणी नाक्यावर गोळीबार केला, जिथे यूएस सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी तैनात होते.
अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत संशयित हल्लेखोराला गोळी लागून तो जखमी झाला व रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. गेल्या महिनाभरात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवासस्थानाजवळ किंवा ते हजर असलेल्या ठिकाणी गोळीबार होण्याची ही तिसरी घटना आहे.
या गोळीबारात एक सामान्य नागरिकही गोळी लागून जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्याला हल्लेखोराची गोळी लागली की प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ही दुखापत झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या जखमीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
गोळीबाराच्या या घटनेत सुदैवाने कोणताही सुरक्षा अधिकारी जखमी झालेला नाही. घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते, परंतु त्यांच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झालेला नाही, असे सिक्रेट सर्व्हिसने स्पष्ट केले आहे. वास्तविक पाहता, ट्रम्प हे विकेंडसाठी न्यू जर्सी येथील त्यांच्या गोल्फ क्लबवर जाणार होते, परंतु शुक्रवारी त्यांनी आपला प्लॅन बदलला आणि ते व्हाईट हाऊसमध्येच थांबले होते.
शनिवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर पेनसिल्व्हेनिया एव्हेन्यूच्या परिसरात ही घटना घडली. संशयिताने अचानक आपल्या बॅगमधून बंदूक काढली आणि गोळीबार सुरू केला. सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी त्वरित प्रत्युत्तर देत संशयितावर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
नासीर बेस्ट (वय २५) असे या ठार झालेल्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयीन नोंदींनुसार, नासीर बेस्ट याला यापूर्वी जुलै २०२५ मध्येही व्हाईट हाऊसच्या दुसऱ्या एका तपासणी चौकीत बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने सुरक्षा अधिकाऱ्यांचे आदेश मानले नव्हते आणि स्वतःला ‘येशू ख्रिस्त’ म्हणवून घेत अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला संबंधित परिसरापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते.