२६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाचे नागरिकत्व कॅनडा सरकार करणार रद्द

मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याचे नागरिकत्व रद्द करण्याची तयारी कॅनडा सरकार करीत आहे. राणा सध्या भारतातील तुरुंगात आहे. तो मूळ पाकिस्तानी वंशाचा असून त्याला २००१ मध्ये कॅनडाचे नागरिकत्व मिळाले होते. मात्र, हे नागरिकत्व मिळवताना तो खोटे बोलल्याचा आरोप त्याच्यावर आहे, त्यामुळे आता त्याचे नागरिकत्व रद्द होणार आहे.
२६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाचे नागरिकत्व कॅनडा सरकार करणार रद्द
Published on

टोराण्टो : मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याचे नागरिकत्व रद्द करण्याची तयारी कॅनडा सरकार करीत आहे. राणा सध्या भारतातील तुरुंगात आहे. तो मूळ पाकिस्तानी वंशाचा असून त्याला २००१ मध्ये कॅनडाचे नागरिकत्व मिळाले होते. मात्र, हे नागरिकत्व मिळवताना तो खोटे बोलल्याचा आरोप त्याच्यावर आहे, त्यामुळे आता त्याचे नागरिकत्व रद्द होणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी भारताला खूश करण्याचा प्रयत्न कॅनडा करीत आहे.

कॅनडाच्या इमिग्रेशन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राणा याने २००० मध्ये नागरिकत्वासाठी अर्ज केला, तेव्हा त्याने गेल्या चार वर्षांपासून ओटावा आणि टोरंटोमध्ये राहत असल्याचा दावा केला होता, मात्र हा दावा खोटा ठरला आहे. तसेच त्याने फक्त सहा दिवसांसाठी कॅनडाबाहेर असल्याचा दावा केला होता. मात्र, हा दावाही खोटा ठरला आहे. इमिग्रेशन विभागाने सांगितले की, नागरिकत्व मिळवण्यापूर्वी राणाने आपला सर्व वेळ शिकागोमध्ये घालवला होता, आणि तेथे त्याने संपत्तीही कमावली होती.

इमिग्रेशन विभागाने फसवणूक आणि बनावटगिरीचा संपूर्ण अहवाल तयार केला असून तो न्यायालयात सादर केला जाणार आहे. या पुराव्यांच्या आधारे इमिग्रेशन विभागाला नागरिकत्व रद्द करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर तहव्वुर राणाचे नागरिकत्व रद्द केले जाणार आहे.

दरम्यान, राणा सध्या भारतीय तुरुंगात कैद असून तो स्वतःसाठी कॉन्सुलर ॲक्सेसची विनंती करत आहे. तो कुटुंबाला भेटण्याची परवानगी मागत आहे. जर कॅनडाने त्याला पाठिंबा दिला असता तर भारतासाठी मोठा पेच निर्माण झाला असता, मात्र आता तसे होणार नाही. आता आगामी काळात राणाबाबत भारत सरकार कठोर निर्णय घेऊ शकणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in