बीजिंग : अमेरिकेने तैवानला कितीही मदत केली तरी त्याने तैवानच्या एकीकरणाबाबत आमच्या दृढनिश्चयावर कोणताही परिणाम होणार नाही, असा इशारा चीनने दिला आहे.
चीनच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देण्याची तयारी करण्यासाठी तैवानने नुकत्याच लष्करी कवायती केल्या. तसेच युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना वाचवण्यासाठीच्या नियोजित कार्यक्रमाचा वार्षिक सरावही तेथे पार पडला. त्यातच अमेरिकेने तैवानला ३४५ दशलक्ष डॉलर्सची लष्करी मदत दिली आहे. या सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र खात्यातील तैवानविषयक विभागाने निवेदन जारी केले आहे.
या विभागाच्या प्रवक्त्या चेन बिन्हुआ यांनी त्या निवेदनात म्हटले आहे की, तैवानला अमेरिकेने कितीही आर्थिक किंवा लष्करी मदत दिली तरी काही फरक पडणार नाही. अमेरिकेच्या लष्करी मदतीमुळे तैवान विनाकारण दारुगोळ्याचे कोठार बनत चालले आहे. मात्र, तैवानचे चीनच्या मुख्य भूमीबरोबर एकत्रीकरण करण्याच्या धोरणावर आम्ही ठाम आहोत. अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांमुळे चीनचा दृढनिश्चय तसूभरही ढळणार नाही.