
पॅरिस : आरोग्य, शिक्षण, शेतीसह विविध क्षेत्रात सुधारणा करून ‘एआय’ (कृत्रिम प्रज्ञा) लाखो लोकांचे जीवन बदलण्यास मदत करू शकते. या माध्यमातून शाश्वत विकास उद्दिष्टांचा प्रवास सोपा आणि जलद होईल. मात्र, यासाठी आपण संसाधने आणि प्रतिभा एकत्र आणण्याबरोबरच विश्वास आणि पारदर्शकता वाढवणाऱ्या ‘ओपन-सोर्स सिस्टम’ विकसित केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले.
आपण नि:पक्षपाती दर्जेदार डेटा सेंटर्स उभारली पाहिजेत. नोकऱ्या कमी होणे हा ‘एआय’मधील सर्वात विनाशकारी व्यत्यय आहे; परंतु तंत्रज्ञानामुळे रोजगार नाहीसे होत नाहीत, फक्त त्याचे स्वरूप बदलते, असे इतिहासाने दर्शवून दिले आहे, असेही मोदी म्हणाले. पॅरिसमधील ग्रँड पॅलेस येथे झालेल्या एआय शिखर परिषदेला ते संबोधित करत होते.
सामूहिक प्रयत्न गरजेचे!
‘एआय’ वेगाने विकसित होत आहे आणि वेगाने स्वीकारलेही जात आहे. आपल्या सामायिक मूल्यांचे प्रतिबिंब असणारे, अडथळे दूर करणारे आणि विश्वास निर्माण करणारे प्रशासन आणि मानके स्थापित करण्यासाठी सामूहिक जागतिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रशासन म्हणजे केवळ स्पर्धा निर्माण करणे नाही, तर प्रशासन म्हणजे क्षमतांचा अभाव असणाऱ्यांसाठी समान संधी उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तंत्रज्ञानामुळे रोजगाराचे स्वरूप बदलते
आपण ‘ओपन सोर्स सिस्टीम’ विकसित केल्या पाहिजेत, ज्यामुळे विश्वास आणि पारदर्शकता वाढते. आपण पक्षपात न करता दर्जेदार डेटा सेंटर्स बांधली पाहिजेत, तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले पाहिजे आणि लोककेंद्रित प्रयोग तयार केले पाहिजेत. सायबर सुरक्षा, चुकीची माहिती आणि डीपफेकशी संबंधित चिंता दूर केल्या पाहिजेत. तंत्रज्ञान प्रभावी आणि उपयुक्त होण्यासाठी हेही सुनिश्चित केले पाहिजे की, तंत्रज्ञान स्थानिक परिसंस्थेत रुजलेले आहे. ‘एआय’-संचालित भविष्यासाठी आपल्याला आपल्या लोकांना कौशल्य आणि पुनर्कौशल्य प्रदान करण्यासाठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पायाभूत सुविधा उभारल्या
भारताने १.४ अब्जाहून अधिक लोकांसाठी अतिशय कमी खर्चात डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यशस्वीरीत्या उभारल्या आहेत. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी, प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आणि देशातील जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी विस्तृत काम केले आहे. भारत डेटा गोपनीयतेवर ‘एआय’ स्वीकारण्यात आणि तांत्रिक-कायदेशीर उपायांमध्ये आघाडीवर असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
भविष्याची गुरुकिल्ली मानवाकडेच!
भारत आपल्या विविधतेचा विचार करून स्वतःचे मोठे भाषा मॉडेल तयार करत आहे. संगणकीय संसाधनांचे एकत्रीकरण करण्यासाठी सार्वजनिक-खासगी गुंतवणुकीतील मॉडेल देखील आहे. ते आमच्या स्टार्टअप्स आणि संशोधकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले जात आहे. ‘एआय’चे भविष्य चांगले आणि सर्वांसाठी आहे याची खात्री करण्यासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य सामायिक करण्यास तयार आहे. काही लोकांना काळजी आहे की, यंत्रे बुद्धिमत्तेत मानवांपेक्षा श्रेष्ठ होतील; परंतु आपल्या सामूहिक भविष्याची गुरुकिल्ली मानवांशिवाय कोणाकडेही नाही, जबाबदारीची हीच भावना आपल्याला ‘एआय’ विकासात मार्गदर्शन करेल, असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला.
समाजालाही ‘एआय’कडून आकार
यावेळी मोदी म्हणाले की, ‘एआय’ शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि त्याचे सह अध्यक्ष म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा आभारी आहे. अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि आपल्या समाजालाही ‘एआय’ आकार देत आहे. तुम्ही तुमचा वैद्यकीय अहवाल ‘एआय ॲप’वर अपलोड केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी त्याचा काय अर्थ आहे हे सोप्या भाषेत, कोणत्याही अवघड शब्दांविना स्पष्ट करू शकते, असेही त्यांनी सांगितले.