पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवादी हल्ला ;२३ सैनिक ठार 

सर्व हल्लेखोरांना सुरक्षा दलांनी ठार केले, तर पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आणि त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली
पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात दहशतवादी हल्ला ;२३ सैनिक ठार 

पेशावर : पाकिस्तानात खैबर पख्तुनख्वाच्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या चौकीवर स्फोटकांनी भरलेला ट्रक घुसवून घडवून आणलेल्या स्फोटात पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या चौकीतील २३ सैनिक ठार झाले. पाकिस्तानी तालिबानशी संलग्न दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात आले.

या संबंधात अधिक माहिती देताना पाकिस्तानी लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या लष्कराच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, दक्षिण वझिरिस्तान आदिवासी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अनियंत्रित डेरा इस्माईल खान जिल्ह्यात प्रवेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न 'प्रभावीपणे अयशस्वी' झाल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने हा हल्ला केला.

या हल्ल्यानंतर आणखी एक आत्मघाती हल्ला झाला, ज्यामुळे इमारत कोसळली आणि मोठी प्राणहानी  झाली. १२ डिसेंबरच्या पहाटे डेरा इस्माईल खानच्या दरबान भागात सुरक्षा दलाच्या चौकीवर सहा दहशतवाद्यांच्या सहा गटांनी हल्ला केल्याने किमान २३ सैनिक ठार झाले.

सर्व हल्लेखोरांना सुरक्षा दलांनी ठार केले, तर पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली आणि त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेशी संलग्न असलेल्या तहरिक-ए-जिहाद पाकिस्तान (टीजेपी) या नव्याने स्थापन झालेल्या दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

टीजेपीचा प्रवक्ता मुल्ला कासिम याने या हल्ल्याला 'आत्मघाती मिशन' म्हटले आहे. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. हल्ल्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद असून जिल्हा रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in