टेक्सासमध्ये महापुराचा कहर; ५१ जणांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सास राज्यात ग्वाडालुपे नदीला आलेल्या महापुरामुळे मृतांचा आकडा १३ वरून ५१ वर पोहोचला आहे. केर काऊंटीला या पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, येथे १५ मुलांसह ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
टेक्सासमध्ये महापुराचा कहर; ५१ जणांचा मृत्यू
Social Media| X
Published on

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेतील टेक्सास राज्यात ग्वाडालुपे नदीला आलेल्या महापुरामुळे मृतांचा आकडा १३ वरून ५१ वर पोहोचला आहे. केर काऊंटीला या पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, येथे १५ मुलांसह ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ग्वाडालुपे नदीची पाण्याची पातळी केवळ ४५ मिनिटांत २६ फुटांनी वाढली, ज्यामुळे झाडे उन्मळून पडली, वाहने पाण्यात वाहून गेली आणि अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. हजारो घरे जलमय झाली आहेत. बचाव पथकाने आतापर्यंत ८५० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पुराचा धोका अजूनही कायम असून वाहून गेलेल्या २७ मुलींचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर, बोटी आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. आणखी बरेच लोक बेपत्ता असण्याची भीती आहे.

टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी सांगितले की, “बचाव आणि मदत कार्य जोरात सुरू आहे. मात्र, स्थानिक नागरिक प्रशासनावर संतप्त असून, पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीची कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे.”

पूरपरिस्थिती लक्षात घेता, टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अ‍ॅबॉट यांनी आणीबाणीची स्थिती कायम ठेवली आहे. ते म्हणाले की, “बेपत्ता लोकांच्या शोधात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. हे ऑपरेशन २४ तास सुरू राहील. आम्ही सर्वांना शोधून काढू.” टेक्सासमधील सॅन अँटोनियोच्या आसपास मुसळधार पावसात १,००० हून अधिक बचाव कर्मचारी बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in