

बँकॉक : थायलंडमध्ये बुधवारची सकाळ भीषण दुर्घटनेने झाली आहे. एका धावत्या प्रवासी ट्रेनवर क्रेन कोसळल्याने ट्रेन रुळावरून घसरली असून किमान २२ जणांचा मृत्यू आणि ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या ट्रेनमधून सुमारे १९५ प्रवासी प्रवास करत होते, त्यामुळे मृतांचा किंवा जखमींचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सकाळी बँकॉकहून उबोन रात्चाथानी प्रांताकडे ही प्रवासी रेल्वेगाडी जात होती. बँकॉकपासून सुमारे २३० किलोमीटर (१४३ मैल) ईशान्येस असलेल्या नाखोन रात्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात गाडी आली असता ही दुर्घटना घडली. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी रेल्वे मार्गालगत सुरू असलेल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी एक मोठी क्रेन अचानक कोसळली. ही क्रेन थेट धावत्या ट्रेनच्या एका डब्यावर पडली. त्यामुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि काही काळासाठी आगीचे लोळ उठले.
कोसळलेली क्रेन थायलंडमधील बहुचर्चित हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचा भाग
थायलंडचे वाहतूक मंत्री फिफात राचाकिटप्रकार्न यांनी सांगितले की, या ट्रेनमध्ये सुमारे १९५ प्रवासी प्रवास करत होते. ही कोसळलेली क्रेन थायलंडमधील बहुचर्चित हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचा भाग होती. हा प्रकल्प चीनच्या सहकार्याने राबवला जात असून, बँकॉक ते चीनमधील कुनमिंग शहराला लाओस मार्गे जोडण्याची योजना आहे. २०२८ पर्यंत हा रेल्वे नेटवर्क पूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू
अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये बचाव कर्मचारी उलटलेल्या डब्यांमधून जखमींना बाहेर काढताना दिसत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली असून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. नाखोन रात्चसिमा प्रांताचे पोलीस प्रमुख थाचापोन चिनावोंग यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.” प्रांताच्या जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत काही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या भीषण अपघातामुळे थायलंडमध्ये शोककळा पसरली असून, प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.