भारतीय चलनात नोंदवली सर्वात मोठी घसरण

भारतीय चलनात नोंदवली सर्वात मोठी घसरण

भारतीय चलनात आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया सार्वकालिक नीचांकी पातळीवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन चलन मजबूत झाल्यामुळे रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले आहे. सुरुवातीच्या व्यवहारात रुपया ५२ पैशांनी घसरून ७७.४२ वर आला होता, दिवसअखेरीस तो तब्बल ६० पैशांनी घसरुन ७७.५० झाला. डॉलर मजबूत होण्याबरोबरच विदेशी गुंतवणूक संस्थांकडून पैसे काढून घेण्याचा सपाटा सुरु राहिल्याचा परिणाम भारतीय चलन कमकुवत होण्यावर झाला.

तत्पूर्वी, सकाळी मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर, आंतरबँक परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ७७.१७वर उघडला आणि अल्पावधीतच ७७.४२पर्यंत खाली आला. रुपयाच्या मागील बंद किमतीच्या तुलनेत ही ५२ पैशांची घसरण होती. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी भारतीय चलन डॉलरच्या तुलनेत ५५ पैशांनी घसरले आणि ७६.९०वर बंद झाले.

आयात खर्च वाढणार

रुपयाच्या घसरणीचा सर्वात वाईट परिणाम आयातीवर होतो. कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाल्यास, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या ८० टक्के आयात करतो. अशा स्थितीत रुपयाच्या घसरणीमुळे कच्च्या तेलाच्या आयातीचा खर्च वाढेल आणि त्यावर परकीय चलन जास्त खर्च होईल. याशिवाय, भारत खते आणि रसायनांचीही मोठी आयात करतो. रुपयाच्या घसरणीमुळे खते आणि रसायनेही महाग होतील. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते दागिनेही महागणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in