चीनचा मोर्चा आता उत्तराखंडकडे, सीमेलगत वसवत आहे नवे गाव

अरुणाचल प्रदेश सीमेवर भारतीय हद्दीत चीनने अनेकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला
चीनचा मोर्चा आता उत्तराखंडकडे, सीमेलगत वसवत आहे नवे गाव

भारताविषयी चीनच्या कुरपती करणे कमी होताना दिसत नाही. अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवरून दोन्ही देशात तणाव असतानाच आता चीनने आपला मोर्चा उत्तराखंडकडे वळवला आहे. उत्तराखंड सीमेला लागून असलेल्या भागात अवघ्या काही किलोमीटर अंतरावर चीन एक नवे गाव वसवत असल्याचे उघडकीस आले आहे. चिनी सैन्य दल पीपल्स लिबरेशन आर्मीच्या देखरेखीखाली हा प्रकार सुरू आहे.

चीन सातत्याने भारतावर कुरघोडी करण्याचे काम करत आला आहे. अरुणाचल प्रदेश सीमेवर भारतीय हद्दीत चीनने अनेकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत चीनला यात यशस्वी होऊ दिले नाही. त्यामुळे अरुणाचलच्या सीमावर्ती भागात भारताला लागून गावे वसवण्याचे चीनकडून प्रकार सुरू आहेत. त्यावर भारताने अनेकदा आक्षेप घेऊनही चीनच्या धोरणात सुधारणा होताना दिसत नाही. उलट आता चीनने उत्तराखंडकडे आपला मोर्चा वळवला आहे. प्रत्यक्ष नियंत्रणरेषेपासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर २५० घरांचे एक गाव वसवण्यात येत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या देखरेखीखाली चीनचा हा उद्योग सुरू आहे. पूर्वेकडील सेक्टरमधील आपल्या हद्दीत अशी ४०० गावे वसवण्याची चीनची योजना आहे.

२०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीनचे संबंध अधिकच बिघडले आहेत. या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनच्या सैन्याचीही मोठी प्राणहानी झाली होती. सीमेवरील तणावाचे निराकरण करण्याच्या प्रयत्नात दोन्ही राष्ट्रांच्या लष्करी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, परंतु अद्याप ठोस निष्कर्ष निघालेला नाही. सीमा समस्यांचे निराकरण होईपर्यंत चीनशी संबंध पूर्ववत होऊ शकत नाहीत, असे भारताने ठणकावून सांगितले. अशातच चीन उत्तराखंडच्या सीमेलगत गावे वसवून नव्या उचापती करत आहे.

भारतीय लष्कर सावध

उत्तराखंड राज्याची चीनशी ३५० किलोमीटरची सीमा आहे. उत्तराखंडच्या सीमावर्ती भागात उपजीविकेची साधने नसल्यामुळे येथील लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आहे. त्यामुळे भारतीय हद्दीतील गावे ओस पडली असताना चीन आपल्या हद्दीत आधुनिक गावे वसवत असल्यामुळे भारतीय लष्कर सावध झाले आहे. एलएसीवरील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in