मोरोक्को भूकंपातील बळींची संख्या २ हजारांवर

मानवी हेतूने मदत करायला येणाऱ्या देशांसाठी ही हवाई हद्द खुली केली
मोरोक्को भूकंपातील बळींची संख्या २ हजारांवर

रबात : मोरोक्कोत शनिवारी झालेल्या भूकंपातील बळींची संख्या २ हजारांवर गेली आहे. हजारो लोक ढिगाऱ्याखाली सापडले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत. २०१२ जणांचा मृत्यू झाला असून २०५९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

६.८ रिश्टर स्केल क्षमतेचा हा भूकंप मारकेश या पर्यटनस्थळापासून ७२ किमीवर अंतरावर झाला. या भागातील गावेच्या गावे उद‌्ध्वस्त झाली आहेत.

अत्यंत दुर्गम भागात मदतीसाठी सैन्य व आपत्कालीन पथकांनी काम सुरू केले. ‘अल-हौज’ प्रांतात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे सर्वाधिक १२९३ बळी याच प्रांतात गेले आहेत. त्यानंतर ताराऊंद भागात ४५२ जणांचा मृत्यू झाला.

मोरोक्कोने तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. फ्रान्स, इस्त्रायल, इटली, स्पेन व अमेरिकेने मदतीचा हात देऊ केला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन फिनर यांनी सांगितले की, आम्ही सर्वतोपरी सहाय्य करण्यास तयार आहोत. मदत व बचाव पथके तैनात करण्यास तयार असून निधी देण्याची आमची तयारी आहे. आम्ही प्रत्येक पावलावर त्यांच्या मदतीला आहोत.

स्पेनने सांगितले की, आम्हाला मदतीची विनंती केल्यास आम्ही बचाव व मदत देऊ, तर अल्जेरिया या शेजारी देशाशी मोरोक्कोचे वाद आहेत. त्या देशानेही आपली हवाई हद्द खुली केली आहे. मानवी हेतूने मदत करायला येणाऱ्या देशांसाठी ही हवाई हद्द खुली केली.

रेडक्रॉसचे मध्य पूर्व व उत्तर आफ्रिकेचे संचालक होस्साम ईलशरकावी म्हणाले की, भूकंपामुळे झालेले नुकसान भरून काढायला आठवडे, महिने नव्हेत, तर वर्षे लागतील. १९६० पासूनचा हा मोरोक्कोतील मोठा भूकंप आहे.

logo
marathi.freepressjournal.in