फ्रेंच प्रतिक्रांती ?

फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे दिली
फ्रेंच प्रतिक्रांती ?
Published on

फ्रान्स : वाहतूक पोलिसांनी वाहन तपासणीदरम्यान एका १७ वर्षीय मुलाला बंदुकीची गोळी घालून ठार केल्यानंतर फ्रान्समध्ये उसळलेला हिंसाचार आठवडाभरानंतरही पूर्णपणे थांबलेला नाही. इतकेच नव्हे तर आता त्याचे लोण शांततेचे प्रतीक मानल्या जाणाऱ््या शेजारच्या स्वित्झर्लंडमध्येही पसरू लागले आहे. या घटना सध्या युरोपच्या समाजजीवनात चाललेल्या उलथापालथीच्या द्योतक आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण दिली. मात्र, आज त्याच फ्रान्समध्ये चाललेले हे प्रकार म्हणजे फ्रान्स प्रतिक्रांतीच्या दिशेने चालला आहे काय, असा विचार करायला लावणारे आहेत.

फ्रान्सची राजधानी प’रिसच्या एका उपनगरात २७ जून रोजी वाहतूक पोलिसांनी नेहमीप्रमाणे तपासणी चालवली होती. त्यावेळी नाहेल मेर्झुक नावाचा १७ वर्षीय तरुण वाहतूक पोलिसांनी थांबण्यासाठी केलेला इशारा झुगारून पुढे निघून गेला. तेव्हा तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या फ्लोरियन एम. नावाच्या वाहतूक पोलीस अधिकाऱ््याने त्याच्या दिशेने गोळी झाडली. गोळी लागून नाहेल मारला गेला. नाहेल हा मूळचा अल्जेरियाचा रहिवासी होता. त्याच्या कुटुंबाने फ्रान्समध्ये स्थलांतर केले होते. त्यामुळे फ्रान्समधील मुस्लीम स्थलांतरितांमध्ये असंतोष पसरला. पोलिसांनी जाणून-बुजून अरब वंशाच्या नाहेलवर गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला आणि लवकरच त्यातून दंगल भडकली. त्यात फ्रान्सच्या कट्टर उजव्या विचारसरणीच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला.

आठवडाभरात संपूर्ण फ्रान्समधील अनेक शहरे आणि गावे या हिंसाचारात होरपळत आहेत. दंगलखोरांनी सरकारी इमारती, सार्वजनिक वाहने, दुकाने, शाळा, टाऊन हॉल आदींना आगी लावल्या. रविवारी प’रिसजवळील हे-ले-रोझेज शहरात दंगलखोरांनी महापौर विन्सेंट जॉनब्रुन यांच्या घरावर धावती कार नेऊन धडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना घटनास्थळी कोका-कोला शीतपेयाच्या बाटलीत भरलेले इंधनही सापडले आहे. त्यावरून हल्लेखोरांचा उद्देश्य महापौरांचे घर पेटवण्याचा होता असा कयास पोलिसांनी लावला आहे. मात्र, घराबाहेरच्या लहान भिंतीवर कार धडकल्याने घरापर्यंत पोहोचू शकली नाही आणि पुढील अनर्थ टळला. यावेळी हल्लेखोरांना पाहून महापौरांच्या पत्नीने मुलांबरोबर पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने फटाक्यातील रॉकेट्स सोडली. त्या धामधुमीत महापौरांच्या पत्नीच्या पायाचे हाड मोडले आणि मुलेही जखमी झाली.

या घटनेनंतर देशातील अनेक शहरांच्या महापौरांनी पत्रक जारी करून नागरिकांना शांत राहण्याचे आणि विविध शहरांतील टाऊन हॉलसमोर शांतता यात्रा काढण्याचे आवाहन केले. मृत मुलाची आजी या हिंसाचाराने व्यथित झाली आणि तिने नागरिकांना हिंसाचार थांबवण्याची विनंती केली. नाहेलची आजी नादिया यांनी बीएफएम टीव्ही या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, माझा नातू तर मरण पावला आहे. त्याच्या वियोगाने माझी मुलगी मरणप्राय झाली आहे. नागरिकांनी कृपया हिंसाचार थांबवावा. बस जाळणे, शाळांना आगी लावणे थांबवा. अन्य मुलांच्या माता त्या बसमधून प्रवास करत असतात.
आपल्या नातवावर गोळीबार करणाऱ््या पोलिसाच्या कृत्याबद्दल मला पश्चाताप होतो. पण म्हणून मी सर्व पोलिसांचा द्वेष करत नाही. आज ते रस्त्यांवर आहेत ही बाब महत्त्वाची आहे. दंगलखोर नाहेलच्या मृत्यूचा गैरवापर करत आहेत, असेही नादिया यांनी या मुलाखतीत म्हटले. या दोन्ही आवाहनांनंतर दंगलीला थोडा उतार पडला. पण अद्याप ती पूर्णपणे शमलेली नाही. दंगल रोखण्यासाठी सुमारे ५० हजार पोलीस तैनात केले होते. तर साधारण ३५०० जणांना अटक झाली आहे. आठवडाभराच्या दंगलीत १.१ अब्ज डॉलर्सच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज मेडेफ या फ्रेंच कामगार संघटनेने व्यक्त केला आहे.

नाहेल याच्या मृत्यूमुळे फ्रान्समध्ये अल्पसंख्य स्थलांतरितांना मिळणाऱ््या वागणुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वास्तविक, फ्रान्स हा युरोपमधील सर्वांत मुक्त विचारांचा देश. तेथे १९७८ साली एक कायदा झाला आहे. त्यानुसार देशाच्या लोकसंख्येतील धार्मिक किंवा वांशिक आधारावर नागरिकांची गणना करता येत नाही किंवा ती माहिती जाहीर होत नाही. मात्र, लोकसंख्येवर संशोधन करणाऱ््या इनेड या सरकारी संस्थेने २०२२ साली एक अभ्यास केला. त्यानुसार फ्रेंच लोकसंख्येतील ६० वर्षे वयाखालील ३२ टक्के लोकांचे वडिल किंवा आई परदेशांतून स्थलांतरित झालेले आहेत. वयाच्या १८ वर्षांखालील ८३ टक्के नागरिकांचे किमान एक पालक स्थलांतरित आहेत. त्यातही बहुतांश लोक आफ्रिकेतून आलेले आहेत. गेल्या दोन दशकांत इराक, सीरिया, लिबिया, अफगाणिस्तान आदी देशांत झालेल्या संघर्षानंतर अनेक मुस्लीम निर्वासित फ्रान्स तसेच अन्य युरोपीय देशांत आले आहेत. त्याने युरोपीय देशांतील परीटघडीचे शांत, शिस्तबद्ध जीवन बिघडू लागले आहे. त्यामुळेच युरोपात कट्टर उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांचा जोर वाढत आहे. काही वर्षांपूर्वी फ्रान्समध्येही मेरी ल पेन यांच्या पक्षाला चांगलाच पाठिंबा मिळू लागला होता.

सध्याच्या घटनेच्या मूळाशी आणखी एक कायदा आहे. फ्रान्सने २०१७ साली केलेल्या या कायद्यानुसार वाहतूक पोलिसांना बंदुका बाळगण्याचे आणि तपासणीदरम्यान वाहन थांबवले नाही तर चालकावर थेट गोळीबार करण्याचे अधिकार दिले आहेत. प’रिसमध्ये २०१६ साली तरुणांच्या टोळक्याने एका पोलिसाच्या कारवर पेट्रोल बॉम्ब टाकले होते. त्यात तो पोलीस गंभीररीत्या भाजला जाऊन कोमात गेला होता. त्यानंतर तेव्हाचे गृहमंत्री बर्नार्ड क’झेनॉव्ह यांनी मार्च २०१७ मध्ये ४३५-१ क्रमांकाचे कलम लागू करून हा कायदा आणला. पण आता वाहतूक पोलिसांनी या कायद्याचा दुरुपयोग केल्याचे आरोप होत आहेत. २०२२ सालात या कायद्याचा वापर करून पोलिसांनी १३ जणांना गोळ्या घालून ठार मारले. यर यंदाच्या वर्षातील नाहेलचा मृत्यू ही अशा प्रकारची सहावी घटना आहे. अल्पसंख्याक समुदायाचे म्हणणे आहे की, पोलीस अरब चेहरा दिसताच जास्त सतर्क होतात. अरब नागरिकांची अधिक कसून तपासणी करतात. त्यांना द्वेषपूर्ण वागणूक देतात. तसेच मारल्या गेलेल्या वाहन चालकांमध्ये त्यांचेच प्रमाण जास्त आहे. या जखमेवर मीठ चोळल्यासारखी बाब म्हणजे गोळी झाडणाऱ््या पोलिसाला अटक झाल्यानंतर त्याच्या आणि मृत नाहेलच्या कुटुंबाच्या मदतीसाठी नागरिकांनी आर्थिक निधी गोळा करण्याचे आवाहन केले. त्यात पोलिसासाठी १७ लाख डॉलर्स, तर नाहेलच्या कुटुंबासाठी केवळ साडेचार लाख डॉलर्स जमा झाले. त्याने अल्पसंख्यांकांच्या दाव्याला पुष्टी मिळाली.

वास्तविक, फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वे दिली. पण आज त्याच फ्रान्समध्ये ही तत्वे धोक्यात आल्यासारखी परिस्थिती आहे. एका अर्थाने फ्रान्स आज प्रतिक्रांतीच्या दिशेने निघाला आहे, असेच म्हणता येईल.

logo
marathi.freepressjournal.in