द. कोरियात विद्यार्थ्यांचा सरकारवर खटला;परीक्षा ९० सेकंद लवकर संपवल्याबद्दल नाराजी

केवळ दीड मिनिटाच्या फरकामुळे करिअरवर होणाऱ्या परिणामांची भरपाई म्हणून संपूर्ण वर्षाचा खर्च या विद्यार्थ्यांनी सरकारकडे मागितला आहे.
द. कोरियात विद्यार्थ्यांचा सरकारवर खटला;परीक्षा ९० सेकंद लवकर संपवल्याबद्दल नाराजी
PM

सेऊल : दक्षिण कोरियातील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेण्यात येणारी महत्त्वाची परीक्षा ९० सेकंद लवकर संपवल्याबद्दल तेथील काही विद्यार्थ्यांनी सरकारविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. केवळ दीड मिनिटाच्या फरकामुळे करिअरवर होणाऱ्या परिणामांची भरपाई म्हणून संपूर्ण वर्षाचा खर्च या विद्यार्थ्यांनी सरकारकडे मागितला आहे.

यंदा या परीक्षेला देशभरातून साधारण ५ लाख विद्यार्थी बसले होते. पहिल्या दिवशी कोरियन भाषेचा पेपर सुरू असताना राजधानी सेऊलमधील एका परीक्षा केंद्रावर पेपर संपण्याच्या नियोजित वेळेच्या ९० सेकंद आधी बेल वाजली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर पूर्ण लिहिता आला नाही. नाराज विद्यार्थ्यांनी लगेचच त्या कॉलेजच्या प्रशासनाकडे आणि परीक्षकांकडे याबाबत तक्रार केली. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. प्रशासनाने नंतर त्यांना ९० सेकंदांचा जादा वेळ दिला. पण, त्या वेळेत केवळ रिकामे राहिलेले रकाने भरण्याची परवानगी दिली. आधी लिहिलेल्या मजकुरात काही बदल करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी इतके हिरमुसले की, त्यांनी पुढील पेपर दिलेच नाहीत.

या घटनेचा परिणाम झालेल्या ३९ विद्यार्थ्यांनी थेट सरकारविरुद्ध न्यायालयात खटला भरण्याचा निर्णय घेतला. तसेच सरकारकडून प्रत्येकी २० दशलक्ष वॉन (१५,४०० डॉलर्स) भरपाईची मागणी केली आहे. त्यांच्या वर्षाच्या शिक्षणाचा खर्च इतका आहे. परीक्षेत थोडा कमी वेळ मिळाल्यामुळे वर्ष वाया जाणार आहे, म्हणून त्यांना संपूर्ण वर्षाचा खर्च हवा आहे. त्यांना हा खर्च मिळण्याची आशादेखील आहे. २००२१ साली याच परीक्षेत २ मिनिटे आधी बेल वाजली होती. त्याबद्दल सरकारकडून विद्यार्थांना ७ दशलक्ष वॉन (५२५० डॉलर्स) भरपाई मिळाली होती. चीनमध्ये तर त्याहून मोठी शिक्षा मिळाली होती. चीनमधील हुनाना प्रांतातील एका शाळेत अशाच परीक्षेच्या दरम्यान २०१२ साली एका कर्मचाऱ्याने वेळेच्या २ मिनिटे ४८ सेकंद आधी बेल वाजवली होती. त्याला एका वर्षांसाठी सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

 परीक्षेसाठी विमानसेवा, शेअर बाजार बंद

 दक्षिण कोरियातील विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी दरवर्षी सुनयुंग नावाची परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेच्या निकालावर केवळ विविध विद्यापीठांतील प्रवेशच ठरत नाही, तर नोकऱ्या आणि विद्यार्थ्यांचे एकंदर करिअरही ठरते. इतकेच नव्हे तर या परीक्षेच्या निकालावर अनेक वेळा लग्नेही ठरतात किंवा मोडतात. त्यामुळे दक्षिण कोरियात विद्यार्थ्यांसह सर्वच जण ही परीक्षा फार गांभीर्याने घेतात. ही परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, म्हणून देशाची हवाई हद्द बंद करून विमानांची उड्डाणे रोखली जातात. शेअर बाजार उशीरा सुरू केला जातो. ही परीक्षा जगातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक मानली जाते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in