चांद्रयानचे यश संपूर्ण मानवतेचे

केवळ भारताचे नसून ते संपूर्ण मानवतेचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ग्रीस दौऱ्यात केले
चांद्रयानचे यश संपूर्ण मानवतेचे

अथेन्स : चांद्रयानचे यश केवळ भारताचे नसून ते संपूर्ण मानवतेचे असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ग्रीस दौऱ्यात केले. मोदी यांनी अथेन्स येथे ग्रीसच्या अध्यक्ष कॅटरिना साकेल्लारोपुलू यांची भेट घेऊन द्विपक्षीय प्रश्नांवर चर्चा केली. ग्रीसच्या अध्यक्षांनी चांद्रयानच्या यशाबद्दल मोदींचे अभिनंदन केले. त्यावर मोदींनी ही प्रतिक्रिया दिली.

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स संघटनेच्या परिषदेला उपस्थिती लावल्यानंतर शुक्रवारी मोदी एक दिवसीय भेटीसाठी ग्रीसमध्ये पोहोचले. गेल्या ४० वर्षांत भारतीय पंतप्रधानांनी ग्रीसला दिलेली ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी १९८३ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ग्रीसला भेट दिली होती. अथेन्स येथील विमानतळावर ग्रीसचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज जेरापेट्रिटिस यांनी मोदींचे स्वागत केले. मोदी यांच्या हॉटेलसोमर ग्रीसमधील भारतीयांनी स्वागतासाठी गर्दी केली होती. त्यांनी मोदींबरोबर सेल्फी काढल्या. अथेन्समधील सिन्टॅग्मा चौकात मोदी यांनी ग्रीक युद्धस्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर ग्रीक सेनादलांनी मोदी यांना मानवंदना दिली. पंतप्रधान मोदी यांना ग्रीसचा द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर हा सन्मान बहाल करण्यात आला. त्याबद्दल मोदी यांनी ग्रीसचे आभार मानले.

ग्रीस येथून मोदी भारतात परतल्यानंतर बंगळुरू येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) मुख्यालयाला भेट देऊन चांद्रयान-३ मोहिमेच्या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन करणार आहेत.

२०३० पर्यंत दुप्पट व्यापाराचे उद्दीष्ट

मोदी यांनी ग्रीकचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोतकीस यांच्याबरोबरही चर्चा केली. त्यात दोन्ही देशांचे पुरातन संबंध आणि आधुनिक काळातील सहकार्य यावर भर देण्यात आला. दोन्ही देशांतील व्यापार २०३० सालापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मोदी यांनी यावेळी म्हटले. उभय देशांत शेती, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, पर्यटन, संरक्षण, व्यापार आदी क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यात येत आहे. भारतीय माल युरोपमध्ये पोहोचवण्यासाठी ग्रीस आपली बंदरे आणि विमानतळ भारताला उपलब्ध करून देण्यास तयार आहे. त्या दृष्टीने या भेटीत विशेष चर्चा होणे अपेक्षित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in