उद्दिष्ट्ये साध्य होईपर्यंत युक्रेनमध्ये शांतता नाही : पुतिन- ६ लाख १७ हजार रशियन सैनिक युद्धभूमीवर

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की अमेरिकाधार्जिणे आणि नाझीवादी विचारसरणीचे आहेत
उद्दिष्ट्ये साध्य होईपर्यंत युक्रेनमध्ये शांतता नाही : पुतिन- ६ लाख १७ हजार रशियन सैनिक युद्धभूमीवर
PM

मॉस्को : युक्रेनमधील उद्दिष्ट्ये साध्य होत नाहीत तोपर्यंत तेथे शांतता नांदणार नाही, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी स्पष्ट केले. पुतिन यांनी गुरुवारी वार्षिक पत्रकार परिषद आयोजित केली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. तसेच सध्या युक्रेनमध्ये ६ लाख १७ हजार रशियन सैनिक लढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण केले. त्याला आता दोन वर्षे होत आली आहेत. रशियाने युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिणेकडील बराचसा भाग काबीज केला आहे. युद्धाच्या सुरुवातीला रशियाने उत्तरेकडे काबीज केलेला काही भाग युक्रेनने परत मिळवला आहे. काही महिन्यांपूर्वी युक्रेनच्या सैन्याने रशियाविरुद्ध प्रतिचढाई सुरू केली, पण तिला अपेक्षित यश मिळालेले नाही. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्याने जगाचे लक्ष तिकडे वेधले गेले आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन यांनी वार्षिक पत्रकार परिषद आयोजित करून युद्धाविषयी माहिती दिली.

 रशियाने युक्रेनमधील विशेष लष्करी कारवाई सुरू करताना प्रामुख्याने तीन उद्दिष्ट्ये ठेवली होती. युक्रेनचे नाझीकरण थांबवणे, युक्रनेचे निर्लष्करीकरण करणे आणि युक्रेनला नाटो संघटनेत सामील होण्यापासून रोखून त्याची तटस्थता कायम राखणे, अशी उद्दिष्ट्ये रशियाने आक्रमणापूर्वी ठेवली होती. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदीमीर झेलेन्स्की अमेरिकाधार्जिणे आणि नाझीवादी विचारसरणीचे आहेत. त्यांना सत्तेवरून हटवणे गरजेचे आहे, असे पुतिन यांचे म्हणणे होते. तसेच झेलेन्स्की युक्रेनला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो या लष्करी संघटनेचे सदस्य बनवू पाहत आहेत. तसे झाल्यास नाटोचे सैन्य रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचले असते. हे सर्व रोखण्यासाठी युक्रेनविरुद्ध विषेष लष्करी कारवाई केल्याचे पुतिन यांचे म्हणणे आहे. ही उद्दिष्ट्ये साध्य झाल्याशिवाय युक्रेनमधील युद्ध थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

 दररोज १५०० सैनिकांची भरती

रशियाने आजवर युक्रेनमध्ये ६ लाख १७ हजार सैन्य उतरवले आहे. त्यात २ लाख ४४ हजार अस्थायी लढवय्यांचाही समावेश आहे. त्याशिवाय रशिया गेले काही दिवस दररोज १५०० सैनिकांची भरती करत आहे. आतापर्यंत ४ लाख ८६ हजार सैनिकांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे रशियाला सैन्याचा तुटवडा पडणार नाही, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in