कझान : दहशतवादाशी लढा देताना त्याचा बीमोड करावयाचाच हा एकच ध्यास असावा आणि त्यासाठी सर्वांनी ठोस पाठिंबा दिला पाहिजे, दहशतवादाच्या आव्हानाचा मुकाबला करताना दुटप्पी नीती असू नये, असे स्पष्ट प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले.
कझान येथे आयोजित करण्यात आलेल्या १६ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत मोदी बोलत होते. युवकांना कट्टरतावादाकडे नेण्यापासून रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरजही मोदी यांनी यावेळी अधोरेखित केली. दहशतवादाचा मुकाबला करताना आणि दहशतवादाला आर्थिक पाठबळ मिळू नये यासाठी आपल्याला त्या दृष्टिकोनातूनच सर्वांचा ठोस पाठिंबा मिळावयास हवा, असेही पंतप्रधान म्हणाले.
‘ब्रिक्स’चा विस्तार
‘ब्रिक्स’चा विस्तार करण्याची इच्छा मोदी यांनी व्यक्त केली आणि नव्या सहकाऱ्यांचे स्वागत करण्यास भारत तयार असल्याचेही ते म्हणाले. मात्र याबाबतचे सर्व निर्णय सार्वमताने व्हावे आणि ‘ब्रिक्स’च्या संस्थापकीय सदस्य देशांच्या मतांचा आदर झाला पाहिजे, असेही पंतप्रधान म्हणाले.
मोदी-जिनपिंग द्विपक्षीय चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्यात बुधवारी ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेदरम्यान द्विपक्षीय चर्चा झाली. गेल्या पाच वर्षातील ही प्रथमच नियोजित भेट होती. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्तीबाबत दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आल्यानंतर दोनच दिवसांनी मोदी-जिनपिंग भेट झाली आहे. या भेटीतील चर्चेचा तपशील कळू शकला नाही.
संयुक्त राष्ट्रांकडे प्रस्ताव प्रलंबित
पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याबाबतचे अनेक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांकडे प्रलंबित असून त्यामध्ये चीनने आडकाठी आणली आहे. दुटप्पी नीतीला थारा असून नये, या मोदी यांच्या वक्तव्याला या पार्श्वभूमीवर महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदी यांच्या भाषणाच्या वेळी रशियाचे अध्यक्ष पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि इराणचे पेझेशकियान उपस्थित होते.