

नवी दिल्ली : ओमानजवळ भारतीय खलाशी असलेल्या जलवीर या आणखी एका जहाजावर अमेरिकेने हल्ला केला. गेल्या काही दिवसांतला हा तिसरा हल्ला असून याबाबत भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे. जहाजांवर होणारे हल्ले तत्काळ थांबवावे, असे भारताने अमेरिकन राजदूताला खडसावले आहे.
दरम्यान, या जहाजावरच्या खलाशांनी ‘अमेरिकन सैन्याच्या सूचनांचे वारंवार पालन न केल्यामुळे’ जहाजाच्या इंजिन रूमवर हल्ला केला, असा खुलासा अमेरिकेतर्फे करण्यात आला आहे.या जहाजाने इराणी तेलाची वाहतूक करण्याचा प्रयत्न करून इराणविरुद्धच्या अमेरिकन नाकेबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
अमेरिकन नौदलाने भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर, ‘एमटी जलवीर’ वरही हल्ला केला. या जहाजावरील सर्व २२ भारतीय सुरक्षित असून त्यांना बाहेर काढले आहे, अशी माहिती भारतीय परराष्ट्र खात्यातर्फे देण्यात आली. भारताने या प्रकरणी अमेरिकन राजदूतांना पाचारण करून तीव्र निषेध नोंदवला आणि जहाजांवरील हल्ले त्वरित थांबले पाहिजेत, असे सांगितले.
भारत सरकारने अमेरिकन दूतावासाचे प्रभारी अधिकारी जेसन मीक्स यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून आपली चिंता व्यक्त केली आणि भारतीय खलाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले.
१८ हजार भारतीय खलाशी
'सेटेबेलो' या जहाजावर झालेल्या हल्ल्यात तीन भारतीय कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये कॅडेट आदित्य शर्मा, फिटर शिवानंद चौरसिया आणि मुख्य अभियंता (चीफ इंजिनिअर) पाटणला सुरेश यांचा समावेश आहे. गुरुवारी ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जलवीर' या जहाजावर हल्ला झाला. सुदैवाने, या जहाजावरील सर्व २० भारतीय कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दिल्लीने दिली आहे. या घटनेच्या तीन दिवस आधी, निर्बंध लादलेले तेल टँकर 'मारिव्हेक्स'वर हल्ला झाला होता. हे जहाज बुडण्यापूर्वी त्यावरील २४ भारतीय कर्मचाऱ्यांची यशस्वी सुटका करण्यात आली. तिन्ही जहाजांवर अमेरिकन नौदलाने हल्ला केला आहे. आखाती क्षेत्रात सध्या १३ भारतीय ध्वज असलेली जहाजे असून त्यावर १८ हजारांपेक्षा जास्त भारतीय खलाशी आहेत. यातील ५६२ खलाशी भारतीय जहाजांवर तैनात आहेत.