ही युद्ध करण्याची वेळ नाही! ऑस्ट्रियाचे चॅन्सलर नेहाम्मर यांच्या भेटीत मोदींचा पुनरुच्चार

युक्रेनसह जगभरात सुरू असलेले अन्य संघर्ष, पश्चिम आशियातील स्थिती यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहाम्मर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
ही युद्ध करण्याची वेळ नाही! ऑस्ट्रियाचे चॅन्सलर नेहाम्मर यांच्या भेटीत मोदींचा पुनरुच्चार
ANI

व्हिएन्ना : युक्रेनसह जगभरात सुरू असलेले अन्य संघर्ष, पश्चिम आशियातील स्थिती यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियाचे चॅन्सलर कार्ल नेहाम्मर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मोदी यांनी ही युद्ध करण्याची वेळ नसल्याचा पुनरुच्चार केला.

मोदी यांचे रशियातून व्हिएन्ना येथे मंगळवारी सायंकाळी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झाले. परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्यासाठीच्या नव्या शक्यता आणि आगामी दशकासाठी सहकार्याची दिशा निश्चित करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात आल्याचे मोदी यांनी सांगितले.

नेहाम्मर आणि आपण फलदायी चर्चा केली, परस्पर सहकार्याच्या नव्या शक्यता पडताळून पाहण्यात आल्या, दोन्ही देशांमधील संबंधांना दिशा देण्याचेही ठरविण्यात आले आणि आगामी दशकासाठी मार्गदर्शक आराखडा करण्याचाही निर्णय झाला, असे मोदी यांनी नेहाम्मर यांच्यासह संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जगभरात सध्या सुरू असलेले संघर्ष, युक्रेन आणि पश्चिम आशियातील स्थिती यावर चर्चा केली, तेव्हा ही युद्ध करण्याची वेळ नाही, असे आपण स्पष्ट केल्याचे मोदी म्हणाले. भारत आणि ऑस्ट्रियाने दहशतवादाचा निषेध केला, कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद मान्य नसल्याचे, दहशतवादाचे समर्थन होऊ शकत नसल्याचे दोघांनी स्पष्ट केले.

मोदींचे ऑस्ट्रियात जोरदार स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहाम्मर यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली. मोदी यांचे मंगळवारी रात्री मॉस्कोहून दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले. गेल्या ४० वर्षातील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे.

मोदी यांचे येथे आगमन होताच त्यांना मानवंदना देण्यात आली. भारत आणि ऑस्ट्रिया द्विपक्षीय संबंधांचा नवा अध्याय सुरू करीत आहेत, नेहाम्मर यांनी मोदी यांचे फेडरल चॅन्सलरी येथे स्वागत केले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

मोदी आणि नेहाम्मर एकमेकांना आलिंगन देत असतानाचे एका छायाचित्रात दिसत आहे तर चॅन्सलर हे मोदींसमवेत सेल्फी घेत असल्याचे दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे. नेहाम्मर यांनी मोदींचे स्वागत करताना आनंद झाल्याचे नमूद केले, भारत आणि ऑस्ट्रिया मित्र आणि भागीदार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

‘वंदे मातरम’ने मोदींचे स्वागत

लखनऊमध्ये जन्मलेल्या विजय उपाध्याय यांनी ‘वंदे मातरम’ने मोदी यांचे स्वागत केले. उपाध्याय यांनीच ‘वंदे मातरम’ गायले आणि वाद्यवृंदही त्यांचाच होता. मोदी हे ऑस्ट्रियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वॅन डर बेल्लेन यांचीही भेट घेणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in