'हा तर मूर्खपणा...' भारत UNSC चा स्थायी सदस्य नसल्यामुळे इलॉन मस्कने सुनावले खडेबोल

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) स्थायी सदस्य नसणे हा मूर्खपणा असल्याचे म्हणत 'टेस्ला'चे सीईओ आणि 'एक्स'चे मालक इलॉन मस्क यांनी स्थायी सदस्यत्वाच्या भारताच्या दावेदारीला खुला पाठिंबा दिला आहे.
Musk
Musk

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) स्थायी सदस्य नसणे हा मूर्खपणा असल्याचे म्हणत 'टेस्ला'चे सीईओ आणि 'एक्स'चे मालक इलॉन मस्क यांनी स्थायी सदस्यत्वाच्या भारताच्या दावेदारीला खुला पाठिंबा दिला आहे. जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या संयुक्त राष्ट्रांत काही मुद्यांवर बदल करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. नुकतेच UN चे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी UNSC मध्ये एकाही आफ्रिकन देशाकडे कायम सदस्यत्व नसल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. त्यावर, अमेरिकेत जन्मलेले इस्रायली उद्योगपती मायकेल आयझेनबर्ग यांनी भारताच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. तोच धागा पकडत आता मस्क यांनीही भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) स्थायी सदस्य नसणे हा मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.

इलॉन मस्क यांनी काय म्हटले?

कधीतरी, संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे जास्त शक्ती आहे त्यांना आपली ताकद कमी होऊ द्यायची नाही, ही अडचण आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असूनही भारताला सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान न मिळणे हे मूर्खपणाचे आहे, असे मस्क यांनी एका पोस्टमध्ये म्हटले. त्यांनी UNSC मध्ये आफ्रिकेलाही स्थान मिळावे असेही सांगितले.

गुटेरेस यांच्या पोस्टनंतर वादाला तोंड फुटले-

यापूर्वी, रविवारी, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी, कोणताही आफ्रिकन देश सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. सुरक्षा परिषदेत अद्याप एकही आफ्रिकन स्थायी सदस्य नाही हे आपण कसे स्वीकारू? संस्थांनी आजचे जग प्रतिबिंबित केले पाहिजे, 80 वर्षांपूर्वीचे नाही. सप्टेंबरची 'समिट ऑफ द फ्युचर' ही जागतिक प्रशासन सुधारणांवर विचार करण्याची आणि पुन्हा विश्वास निर्माण करण्याची संधी असेल, असे गुटेरस म्हणाले होते. गुटेरेस यांच्या पोस्टला उत्तर देताना, अमेरिकेत जन्मलेले इस्रायली उद्योगपती मायकेल आयझेनबर्ग यांनी भारताच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित केला. कायम सदस्यत्वासाठी भारताचा विचार का केला जात नाही, असा सवाल त्यांनी केला. युनायटेड नेशन्स बरखास्त करून एक कणखर नेतृत्व असलेली नवीन संघटना तयार करण्याचेही त्यांनी सुचवले होते. आयझेनबर्ग यांच्या ट्विटला उत्तर देताना, "पृथ्वीवरील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असूनही भारताला सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागा न मिळणे मूर्खपणाचे आहे" असे म्हटले आहे.

दरम्यान, UNSC च्या पाचपैकी चार स्थायी सदस्य राष्ट्रांनी (चीन वगळता) सर्वोच्च जागतिक संस्थेमध्ये कायमस्वरूपी जागेसाठी भारताच्या उमेदवारीला नेहमीच पाठिंबा दिला आहे. पण, चीनने नेहमी आडकाठी केली.

logo
marathi.freepressjournal.in