जगातील सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील तीन शाळांना नामांकन

२०२२ पासून हा पुरस्कार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार
File Photo
File Photo

जागतिक सर्वोच्च शाळा पुरस्कारांसाठी नामांकित झालेल्या जगभरातील १० शाळांपैकी भारतातील पाच शाळा निवडण्यात आल्या आहेत. आनंदाची बाब अशी की, त्यातील तीन शाळा महाराष्ट्रातील आहेत, तर उर्वरित एक शाळा दिल्लीची व एक अहमदाबादची आहे. समाजाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. गुरुवारी ही नावे जाहीर करण्यात आली.

यूकेतील ‘टी ४’ एज्युकेशनकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा ॲसेंचर, अमेरिकन एक्स्प्रेस, यायासन हसनाह व लेमन्न फाऊंडेशन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. समुदाय सहयोग, पर्यावरणीय कृती, नावीन्य, प्रतिकूलतेवर मात आणि निरोगी जीवनाचे समर्थन या श्रेणीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

२०२२ पासून हा पुरस्कार दिला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हे पुरस्कार दिले जातात. दहापैकी टॉप तीन शाळांची नावे सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात येणार आहेत, तर विजेत्या शाळेचे नाव ऑक्टोबरमध्ये जाहीर केले जाईल. या पुरस्कारासाठी २,५०,००० अमेरिकन डॉलर्सच्या निधीची तरतूद आहे. ‘टॉप फाइव्ह’ विजेत्यांना ५०,००० अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम प्रत्येकाला देण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ शाळांना मिळाले नामांकन

‘समुदाय सहयोग’ या श्रेणीत भारताच्या ‘ओबेरॉय इंटरनॅशनल शाळे’चा समावेश आहे. ही मुंबईतील शाळा असून, स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा आहे. मुंबईतील ‘शिंदेवाडी पब्लिक स्कूल’ (आकांक्षा फाऊंडेशन) या शाळेलाही ‘निरोगी जीवनाचे समर्थन’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. लॉकडाऊननंतर या शाळेने रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि कुपोषित बालकांसाठी काम केले. ‘प्रतिकुलतेवर मात’ या श्रेणीमध्ये ‘स्नेहल’ या महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा समावेश आहे. या शाळेने एड्सग्रस्त पालकांच्या मुलांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवला आहे.

दिल्लीतील ‘नगर निगम प्रतिभा बालिका विद्यालय’ एफ ब्लॉक, दिलशाद कॉलनी ही सरकारी शाळाही या स्पर्धेसाठी ‘समुदाय सहयोग’ या श्रेणीसाठी नामांकित झाली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील ‘रिव्हरसाइड शाळे’लाही या स्पर्धेसाठी ‘इनोवेशन’ श्रेणीत नामांकन मिळाले आहे. या शाळेने ‘आय कॅन’ ही सुरू केलेली योजना जगभर प्रसिद्ध झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in