
वॉशिंग्टन : जगातील विविध देशांवर टॅरिफ लावणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या औषधांवर २०० टक्के टॅरिफ लावण्याचा विचार चालवला आहे. हा टॅरिफ लावल्यास अमेरिकेतील औषधांच्या किमती गगनाला भिडण्याचा अंदाज आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ज्यांनी आतापर्यंत औषधांवर शुल्क माफ केले होते. परंतु शुल्क लावण्याचे सूतोवाच केले. आता ते परदेशात तयार होणाऱ्या औषधांवर २०० टक्के किंवा त्याहून अधिक कर लावण्याचा विचार करत आहेत, असे एका अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेने अनेक दशकांपासून परदेशी औषधांना शुल्कमुक्त प्रवेश दिला आहे. तथापि, युरोपसोबतच्या अलीकडील व्यापार करारामध्ये, अमेरिकेने काही युरोपीय वस्तूंवर, ज्यात औषधांचा समावेश आहे, १५ टक्के शुल्क लावले. मात्र, औषधांवर २०० टक्के शुल्क हा ट्रम्प यांचा अमेरिकेत औषधं स्वस्त करण्याच्या आश्वासनाच्या विरोधात आहे.
कठोर शुल्क लावल्यास याउलट परिणाम होईल, पुरवठा साखळी विस्कळीत होईल, परदेशी स्वस्त औषधं अमेरिकेतून बाहेर पडतील आणि तुटवडा निर्माण होईल, असे वृत्तसंस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वित्तीय सेवा कंपनी ‘आयएनजी’चे आरोग्य अर्थतज्ज्ञ डीडेरिक स्टॅडिग यांनी सांगितले की शुल्काचा सर्वाधिक फटका ग्राहकांना बसेल, कारण त्यांना महागाईचा थेट परिणाम जाणवेल.