
भारतावर १ ऑगस्टपासून तब्बल २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा धक्का अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बुधवारी दिला. ही घोषणा केल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी पाकिस्तानला गोंजारत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानसोबत तेल क्षेत्रातील नव्या कराराची माहिती देताना ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्ट केली असून त्याद्वारे भारतावर थेट निशाणा साधलाय.
पाकिस्तानला गोंजारत भारतावर निशाणा
"अमेरिकेने नुकताच पाकिस्तानसोबत एक करार पूर्ण केला आहे. या कराराअंतर्गत पाकिस्तानातील विशाल तेलसाठ्यांना विकसित करण्यासाठी पाकिस्तान आणि अमेरिका एकत्र काम करतील", असे ट्रम्प यांनी सांगितले. पुढे ट्रम्प यांनी, "या भागीदारीचं नेतृत्व कोणती तेल कंपनी करेल, हे ठरवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोण जाणे, कदाचित ते भविष्यात भारताला तेल विकतील!" अशा आशयाची पोस्ट करीत भारताला मुद्दाम डिवचण्याचं काम केलं आहे.
रशियाकडून खरेदी केली म्हणून भारताला दंडही आकारणार - ट्रम्प
याआधी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा करताना, "भारत हा आपला मित्र देश असला तरी, आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यावसाय केला आहे. जगातील सर्वात जास्त आयात शुल्क भारत लादत आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक व्यापार अडथळे आहेत. तसेच, त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केले आहे. चीनसह रशियाकडील तेलाचे ते सर्वात मोठे खरेदीदार आहेत. सर्व जग रशियाला युक्रेनमधील विध्वंस थांबवण्यास सांगत असताना या बाबी योग्य नाहीत. त्यामुळे भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के आयात शुल्क तसेच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल", अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर मांडली होती.
भारतीय बाजारपेठेसाठी ट्रम्प यांचे दबावतंत्र
अमेरिकेत तयार होणाऱ्या उत्पादनांना सहजपणे भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळावा यासाठी ट्रम्प सातत्याने भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतावर त्यांनी २५ टक्के आयात शुल्क लागू करण्याबाबत केलेली घोषणा त्या दबावतंत्राचाच एक भाग आहे. यापूर्वी दबावतंत्राचा भाग म्हणून चीनसह अन्य देशांवरही अमेरिकेने प्रचंड ‘टॅरिफ’ लादले होते. मात्र, नंतर ते मागे घेतले किंवा निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली.