भारतातून नोकरभरती करू नका! ट्रम्प यांचा अमेरिकन टेक कंपन्यांना इशारा
संग्रहित छायाचित्र

भारतातून नोकरभरती करू नका! ट्रम्प यांचा अमेरिकन टेक कंपन्यांना इशारा

गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर आयटी कंपन्यांनी भारत, चीनसारख्या देशातील नोकरभरती कमी करून अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे. चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग यूनिट सुरू करणे आणि भारतातून कर्मचाऱ्यांची भरती करणे थांबबावे, असा अशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
Published on

वॉशिंग्टन : गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इतर आयटी कंपन्यांनी भारत, चीनसारख्या देशातील नोकरभरती कमी करून अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे. चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग यूनिट सुरू करणे आणि भारतातून कर्मचाऱ्यांची भरती करणे थांबबावे, असा अशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांमध्ये आता भारतीयांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वॉशिंग्टन येथे झालेल्या ‘एआय समिट’मध्ये ट्रम्प यांनी बुधवारी सांगितले की, “बऱ्याच कालावधीपासून अमेरिकेतील तंत्रज्ञान उद्योगाने जागतिकीकरणाचा पुरस्कार केल्यामुळे लाखो अमेरिकन नागरिकांमध्ये अविश्वास आणि फसवणुकीची भावना निर्माण झाली आहे. अनेक मोठ्या अमेरिकन टेक कंपन्यांनी अमेरिकन स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा उचलत आपले कारखाने चीनमध्ये उभारले, भारतातील कर्मचारी नियुक्त केले आणि आयर्लंडमध्ये नफा लपवला. हे सर्व करताना त्यांनी अमेरिकन नागरिकांकडे दुर्लक्ष केले आणि त्यांची बुद्धिमत्ता, कौशल्य दडपण्याचा प्रयत्न केला. आता अमेरिकेत ट्रम्प सरकार असल्यामुळे हे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

“अमेरिकन कंपन्यांनी आता अमेरिकेतच रोजगार निर्मिती होईल, असे प्रयत्न करावेत. या कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने उघडणे किंवा भारतीय टेक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या पुरविण्याऐवजी अमेरिकेतील नागरिकांनाच काम देण्याचा प्रयत्न करावा. ‘एआय’च्या शर्यतीत अमेरिकेला विजय मिळवून देण्यासाठी टेक कंपन्यांनी देशहिताला प्राथमिकता द्यावी. ‘एआय’च्या स्पर्धेत आघाडी मिळवण्यासाठी आम्हाला टेक्नोलॉजी इंडस्ट्रीमध्ये एक नवी देशभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा आवश्यक आहे,” असेही ट्रम्प म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in