
वॉशिंग्टन : जगात सुरू असलेली सात युद्धे थांबवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची होती, पण ती सर्व युद्धे मी थांबवली. भारत-पाकिस्तानसह सात युद्धे मी थांबवली, पण कोणत्याही पंतप्रधानाने मला मदत केली नाही, असा दावा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करताना ट्रम्प यांचा टेलीप्रॉम्प्टर मध्येच बंद पडला. “यामुळे काहीही अडत नाही. मी आत्तापर्यंत भारत-पाकिस्तानसह सात युद्धे थांबवली आहेत. मला टेलीप्रॉम्प्टरशिवाय भाषण करण्यात काहीही अडचण नाही. टेलीप्रॉम्प्टर काम करत नाहीय, जो कुणी तो नियंत्रित करतो आहे, त्याला त्रास होईल,” असे ट्रम्प यांनी सांगितले.
“कंबोडिया-थायलंड, कोसोवो-सर्बिया, काँगो-रवांडा, भारत-पाकिस्तान, इस्रायल-इराण, इजिप्त-इथिओपिया आणि अर्मेनिया-अझरबैजान अशी सात युद्धे मी थांबवली. कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने किंवा पंतप्रधानाने आणि कोणत्याही देशाने असे काहीही केले नाही. मी ते फक्त सात महिन्यांत केले. हे यापूर्वी कधीही घडले नव्हते. मला ते करण्याचा खूप अभिमान वाटतो. संयुक्त राष्ट्रांऐवजी मला हे करावे लागले. या सर्व प्रकरणांमध्ये संयुक्त राष्ट्रांनी कोणत्याही युद्धात मदत करण्याचा प्रयत्नही केला नाही. ही युद्धे संपवण्याच्या कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून मला एकही फोन आला नाही,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.