न्यूयॉर्क : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, पाकिस्तान आणि 'ऑपरेशन सिंदूर संदर्भात त्यांच्या 'स्टेट ऑफ द युनियन'मध्ये सनसनाटी दावे केले आहेत. ‘मी नसतो, तर पाकिस्तान आणि भारत यांच्यात अणुयुद्ध झाले असते’, असा दावा त्यांनी केला. तसेच, ‘मी हस्तक्षेप केला नसता तर या युद्धात पाकिस्तानचे पंतप्रधान मारले गेले असते’, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘याआधी मी १० युद्धे थांबवली आहेत’, असा दावा ट्रम्प यांनी केला.
ट्रम्प यांनी वारंवार असा दावा केला आहे की, ७ मे रोजी भारताने दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' लाँच केल्यानंतर सुरू झालेला ४ दिवसांचा संघर्ष थांबविण्यासाठी आपणच हस्तक्षेप केला’. ट्रम्प यांनी हे दावे त्यांच्या दुसऱ्या टर्मच्या पहिल्या वर्षातील 'स्टेट ऑफ द युनियन' मधील भाषणादरम्यान केले. तथापि, जेव्हा त्यांनी हे दावे केले, तेव्हा एका काँग्रेस महिला सदस्याने त्यांना ‘हे खोटं आहे’, असे ओरडून सांगितले. भारताने नेहमीच या प्रकरणात कोणत्याही देशाने मध्यस्थी केलेली नाही, असे वारंवार सांगितले आहे. मात्र, ट्रम्प यांनी आपण युद्ध थांबवल्याचे सांगत भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
गाझामध्ये इस्रायल-हमास करार यशस्वी
इस्रायल आणि गाझामध्ये हमास यांच्यातील युद्धबंदी करार यशस्वी झाला. त्यांनी पदावर परतल्यापासून आठ युद्धे संपवली आहेत आणि हे आपले यश असल्याचे ते म्हणाले. गाझामधील युद्ध आता खूपच खालच्या पातळीवर आहे आणि या करारामुळे सर्व इस्रायली बंधकांची सुटका झाली आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.
शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाला दुर्दैवी म्हटले
ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात कर कपातीबद्दल सांगितले की, त्यांच्या प्रमुख कायद्यातील ‘वन बिग ब्युटीफुल बिल’मुळे इतिहासातील सर्वात मोठी कर कपात झाली. ट्रम्प यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला दुर्दैवी म्हटले, ज्यामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्यांतर्गत जागतिक शुल्क लादून त्यांच्या अध्यक्षीय अधिकारांचा गैरवापर केल्याचा निर्णय दिला. ट्रम्प यांनी म्हटले की, या शुल्कांमुळे शेकडो अब्ज डॉलर्स उत्पन्न झाले आणि देशाला आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेचा फायदा झाला. इतर देश पूर्वी अमेरिकेचा फायदा घेत होते, असा आरोप त्यांनी केला.
३२ हजार निदर्शकांना मारल्याचा इराणवर आरोप
ट्रम्प म्हणाले की, इराण अमेरिकेपर्यंत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. इराणने आधीच युरोप आणि आमच्या परदेशातील तळांना धोका निर्माण करणारी क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत आणि लवकरच अमेरिकेपर्यंत पोहोचतील अशा क्षेपणास्त्रांवर ते काम करत आहेत. इराणने ३२ हजार निदर्शकांना मारले आणि अमेरिकेला ते युद्धात ढकलू इच्छित आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम नष्ट केला
अमेरिकेने गेल्यावर्षी इराणच्या अण्वस्त्र सुविधांवर हल्ला करून इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नष्ट केला. प्रथम राजनैतिक मार्गाने आम्ही हा प्रश्न सोडवू इच्छितो, परंतु इराणने अण्वस्त्रे विकसित न करण्याचे आश्वासन दिले नाही, असे ट्रम्प म्हणाले.