

वॉशिंग्टन : इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला एक महिना पूर्ण होत असताना हे युद्ध अमेरिका जिंकत आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र त्याचवेळी आखातामध्ये नव्याने हजारो अमेरिकी सैनिकांना धाडण्याचा निर्णयही जाहीर झाला आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या दाव्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे इराणची शक्ती खच्ची झाली आहे असे वाटत असतानाच इराणने शेजारी देशांवरचे हल्ले आणखी वाढवले आहेत.
इस्रायल व अमेरिकेने २८ फेब्रुवारीला इराणवर हल्ला करून त्याचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासह अनेकांची हत्या केली होती. त्यावेळी हे युद्ध काही दिवसांत संपेल असे अमेरिकेला वाटत होते. पण इराणने या हल्ल्यांचा जोरदार प्रतिकार केला आहे.
गेला महिनाभरात ट्रम्प यांनी युद्धाबाबत उलटसुलट पवित्रे घेतले असून कालच त्यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणखी दहा दिवस हल्ले केले जाणार नाहीत असे म्हटले आहे. होर्मुझवर कब्जा करण्याबाबतही त्यांनी गोंधळ उडवून दिला आहे. त्याबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले की, ट्रम्प यांच्या वेळेनुसार एक दिवस हा खूप मोठा काळ असतो. निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे अजून एक दिवस आहे.
जगातील सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका 'यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड' सध्या क्रोएशियाच्या स्प्लिट बंदरात पोहोचली आहे. इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकन फौजांना बळ देण्यासाठी ही युद्धनौका मध्यपूर्वेच्या दिशेने रवाना होत आहे.
इराणच्या 'बुशेहर' अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात मध्यरात्री हवाई हल्ला झाल्याची माहिती इराणच्या अणुऊर्जा संस्थेने दिली आहे. गेल्या १० दिवसांतील हा तिसरा हल्ला आहे. सुदैवाने, यात कोणत्याही प्रकारचे तांत्रिक नुकसान किंवा जीवितहानी झालेली नाही.
इराणने दुबईतील अमेरिकन सैन्याच्या दोन गुप्त तळांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्याचा दावा केला आहे. या तळांवर सुमारे ५०० हून अधिक अमेरिकन सैनिक होते असे इराणने म्हटले आहे.
मध्यपूर्वेतील युद्धाला एक महिना पूर्ण होत असतानाच, येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हुथी सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी शनिवारी 'अल-मसिराह' या उपग्रह वाहिनीवरून ही माहिती दिली.
सारी यांनी सांगितले की, हुथी सैन्याने दक्षिण इस्त्रायलमधील 'संवेदनशील लष्करी तळांना' लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. इस्त्रायली लष्कराने यापूर्वीच एक क्षेपणास्त्र पाडल्याचे मान्य केले होते. गेल्या महिन्यात युद्ध सुरू झाल्यापासून येमेनमधून इस्रायलवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे.
आज पाकिस्तानात बैठक
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शनिवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. दरम्यान, हे युद्ध थांबवण्यासाठी सौदी अरेबिया, तुर्की आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री रविवारी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे चर्चा करणार असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इसाक दार यांनी दिली आहे.
कुवेत आणि बहरीनवरही हल्ले
युद्धाची व्याप्ती वाढतच चालली असून गेल्या चोवीस तासांत कुवेत आणि बहरीनलाही लक्ष्य करण्यात आले आहे. कुवेतच्या 'मुबारक अल कबीर' आणि 'शुआइबा' बंदरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले झाले. कुवेत आंतरराष्ट्रीय विमानतळावरील रडार यंत्रणेचेही मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेचा पाचवा आरमारी ताफा तैनात असलेल्या बहरीनवर गेल्या २४ तासांत २० क्षेपणास्त्रे आणि २३ ड्रोन डागण्यात आले. २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यापासून बहरीनवर आतापर्यंत १७४ क्षेपणास्त्रे आणि ३८५ ड्रोन हल्ले झाले आहेत.
इराणचा शेजाऱ्यांना इशारा
आपल्या देशाचा विकास आणि सुरक्षा हवी असेल तर आपल्या भूमीचा वापर इराणवर हल्ले करण्यासाठी होऊ देऊ नका, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी आखाती देशांना दिला आहे. इराणच्या आर्थिक केंद्रांना किंवा पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्यास अमेरिका आणि इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा पुनरुच्चार राष्ट्राध्यक्षांनी केला.