दुबई : इराणने 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' पुन्हा खुली करावी यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम ४८ तासांची मुदत दिली होती, मात्र सोमवारी ट्रम्प यांनी त्यामध्ये बदल करीत दिलेली मुदत पाच दिवसांनी वाढविल्याची घोषणा केली आहे. या काळात अमेरिका इराणच्या वीज प्रकल्पांवर कोणतेही हल्ले करणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. मात्र इराणच्या कडक इशाऱ्यानंतर ट्रम्प बॅकफूटवर गेले आणि त्यांनी मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला, असा दावा इराणने केला आहे.
सोमवारी ही मुदत संपण्यास काही तास शिल्लक असतानाच ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल'या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही घोषणा केली. या घोषणेमुळे इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात मागील २३ दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष आता कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की गेल्या दोन दिवसांत संयुक्त राज्य अमेरिका आणि इराण यांच्यात खूप चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली आहे. ही चर्चा मध्य पूर्वातील आमच्या संघर्षाचे पूर्ण समाधान काढण्याशी संबंधित आहे. ही चर्चा आठवडाभर सुरू राहणार असल्याने मी युद्ध विभागाला आदेश दिला आहे की, इराणच्या वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे सर्व सैन्य हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करावेत, हा निर्णय सुरू असलेल्या बैठका आणि चर्चेच्या यशावर अवलंबून असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इराणच्या सरकारी टीव्हीवर या संदर्भात एक ग्राफिक्स प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यात म्हटले आहे की इराणच्या कडक इशाऱ्यानंतर ट्रम्प बॅकफूटवर गेले आणि त्यांनी मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते इब्राहीम रेजाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, लढाई सुरूच आहे आणि हा शत्रूसाठी आणखी एक पराभव आहे. ट्रम्प आणि अमेरिका पुन्हा एकदा पराभूत झाले आहेत.
इराणने हे स्पष्ट केले आहे की पडद्यामागे किंवा प्रत्यक्षरित्या अमेरिकेशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ट्रम्प यांचे हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. अमेरिकेने आपल्यासमोर गुडघे टेकले असल्याचे ही घोषणा अधोरेखित करीत आहे, असे इराणने म्हटले आहे. जर अमेरिकेने इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर कोणताही हल्ला केला, तर ते संपूर्ण प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करतील असा इशारा दिल्यानंतर ट्रम्प यांनी माघार घेतली आणि आपण तो हल्ला स्थगित करण्याचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले, असे इराणच्या दूतावासाने पोस्टमध्ये म्हटले आहे.
वाटाघाटींमधून तोडगा
नेहमीच्या शैलीत 'कॅपिटल लेटर्स'मध्ये लिहिलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले आहे की, अमेरिका आणि इराणमध्ये अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा झाली आहे. या चर्चेतून युद्धाचा 'पूर्ण आणि अंतिम तोडगा' निघण्याची शक्यता आहे. ही चर्चा या संपूर्ण आठवडाभर सुरू राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.