भारत आम्हाला टॅरिफने संपवतो; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा बरळले

भारत आम्हाला टॅरिफमुळे संपवतो आणि आता त्यांनी अमेरिकेला "नो टॅरिफ" देण्याची ऑफर केली आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
भारत आम्हाला टॅरिफने संपवतो; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा बरळले
Published on

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन: भारत आम्हाला टॅरिफमुळे संपवतो आणि आता त्यांनी अमेरिकेला "नो टॅरिफ" देण्याची ऑफर केली आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

"त्यांच्याकडे आमच्यावर टॅरिफ आहेत. चीन आम्हाला टॅरिफने संपवतो. भारत आम्हाला टॅरिफने संपवतो. ब्राझील टॅरिफने संपवतो," असे ट्रम्प यांनी ‘द स्कॉट जेन्निंग्स रेडिओ शो’ या मुलाखतीत सांगितले.

त्यांना टॅरिफबद्दल इतर देशांपेक्षा अधिक माहिती आहे. मी जगातील कुठल्याही माणसापेक्षा टॅरिफ अधिक चांगल्या प्रकारे समजतो. माझ्या टॅरिफमुळे त्यांनी ते कमी करायला सुरुवात केली. भारत हा सर्वाधिक टॅरिफ लावणारा देश होता... आणि आता काय झाले, त्यांनी मला भारतात आता नो टॅरिफ देण्याची ऑफर केली आहे. नो टॅरिफ," असे ते म्हणाले.

जर माझ्याकडे टॅरिफ नसते, तर त्यांनी कधीही अशी ऑफर दिली नसती. त्यामुळे टॅरिफ असणे आवश्यक आहे. आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार आहोत," त्यांनी पुढे म्हटले.

ट्रम्प यांच्या जगभरातील अनेक देशांवरील टॅरिफला फेडरल अपील कोर्टाने बेकायदेशीर ठरविल्यानंतर ट्रम्प यांनी म्हटले की, ही कोर्टातील केस इतर देशांच्या प्रायोजकत्वाखाली चालते कारण ते आमचा फायदा घेत आहेत. आता ते आमचा फायदा घेऊ शकणार नाहीत," अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

भारतावर ट्रम्प प्रशासनाने ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावले आहेत, जे जगातील सर्वाधिक आहेत. यात रशियन तेलाच्या खरेदीवर २५ टक्के टॅरिफचा समावेश आहे.

अमेरिकेने लावलेले टॅरिफ "अन्यायकारक आणि अवास्तव" असल्याचे भारताने म्हटले आहे.

भारताने सांगितले की, कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेसारखेच, देश आपले राष्ट्रीय हितसंबंध आणि आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in