

वॉशिंग्टन : इराणच्या ड्रोन विमानांचा मारा हाणून पाडल्यानंतर, अमेरिकन सैन्याने बुधवारी इराणच्या लष्करी तळावर नव्याने संरक्षणात्मक हल्ले केले, अशी माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडच्या सैन्याने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ धोका निर्माण करणारे इराणचे चार ‘वन-वे अटॅक ड्रोन’ (आत्मघाती ड्रोन) पाडले. याशिवाय, बंदर अब्बास येथील इराणच्या ग्राउंड कंट्रोल स्टेशनवरही अमेरिकेने हल्ला केला, जेथून पाचवे ड्रोन सोडण्याची तयारी सुरू होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी "इराण सध्या शेवटच्या घटका मोजत असून वाटाघाटीसाठी त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही" असा दावा केल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले.
आगामी नोव्हेंबरमधील मध्यावधी निवडणुकांमुळे आपण घाईघाईने कोणताही करार करणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. गेले तीन महिने सुरू असलेल्या या संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत चिंतेचे वातावरण आहे. कॅबिनेट बैठकीच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी लवकरच तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला. वीकेंडला तर त्यांनी अमेरिका आणि तेहरान यांच्यात करारावर 'बऱ्यापैकी चर्चा' झाल्याचे जाहीर केले होते, मात्र अजूनही बोलणी अंतिम झालेली नाहीत. ट्रम्प यांना असा करार हवा आहे ज्याद्वारे हॉरमुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होईल आणि इराणची अणुक्षमता लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा दावा करून त्यांना स्वतःचा विजय घोषित करता येईल.