
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : ‘नाटो’ देशांनी चीनवर ५० ते १०० टक्के शुल्क लावावे आणि रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. ‘नाटो’ने माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिल्यास युक्रेनमधील संघर्ष थांबण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये हे आवाहन केले. अमेरिकेने जी-७ देशांना रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लावण्यास सांगितले होते.
ट्रम्प म्हणाले की, सर्व नाटो देशांनी एकत्रितपणे हेच पाऊल उचलले आणि मॉस्कोकडून तेल खरेदी थांबवली तर ते रशियावर “मोठ्या निर्बंधांची” अंमलबजावणी करण्यास तयार आहेत. नाटोची जिंकण्याची बांधिलकी “१०० टक्क्यांपेक्षा खूपच कमी” आहे आणि काही देश रशियन तेल खरेदी करत असल्याने ते “धक्कादायक” असल्याचे त्यांनी म्हटले.
यामुळे रशियाविरुद्धची तुमची सौदेबाजीची ताकद खूपच कमी होते. नाटो देश तयार झाले की, मी पुढे जाण्यास तयार आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
चीनवर ५० ते १०० टक्के शुल्क लावणे हा या घातक पण युद्धाचा अंत करण्यास मोठा हातभार ठरेल. चीनचा रशियावर मजबूत ताबा असून या कठोर शुल्कांमुळे तो तुटेल, असेही ते म्हणाले.
युक्रेन युद्ध हा त्यांचा संघर्ष नाही आणि ते राष्ट्राध्यक्ष असते तर हे युद्ध कधीच सुरू झाले नसते. “हे बायडेन आणि झेलेन्स्की यांचे युद्ध आहे. मी फक्त ते थांबवण्यासाठी आलो आहे आणि हजारो रशियन व युक्रेनियनांचे जीव वाचवण्यासाठी आलो आहे. नाटोने माझे म्हणणे ऐकले तर युद्ध पटकन संपेल आणि ते जीव वाचतील. अन्यथा तुम्ही माझा वेळ आणि अमेरिकेचा वेळ, ऊर्जा आणि पैसा वाया घालवत आहात,” असे ते म्हणाले.
अमेरिकेने चीनमधून होणाऱ्या आयातीवर अतिरिक्त ३० टक्के कर लावला आहे, तर बीजिंगने वॉशिंग्टनकडून होणाऱ्या आयातीवर १० टक्के कर लावून प्रत्युत्तर दिले आहे.
शुक्रवारी अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेन्ट आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी ॲम्बेसिडर जेमिसन ग्रीअर यांनी जी-७ देशांच्या अर्थमंत्र्यांसोबतच्या चर्चेत रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क लावण्याचे ट्रम्प यांचे आवाहन पुन्हा अधोरेखित केले.