ओबामांनी 'मोठी चूक' केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप; UFO आणि एलियन्सशी संबंधित फाइल्स जाहीर करण्याचे दिले आदेश

परग्रही जीवनाच्या शक्यतेबद्दल "गोपनीय माहिती" उघड करून माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोठी चूक केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.
ओबामांनी 'मोठी चूक' केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप; UFO आणि एलियन्सशी संबंधित फाइल्स जाहीर करण्याचे दिले आदेश
Published on

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएफओ आणि एलियन संदर्भातील सरकारी कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आदेश दिले असून वॉशिंग्टनमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर परग्रही जीवनाच्या शक्यतेबद्दल "गोपनीय माहिती" उघड करून मोठी चूक केल्याचा आरोपही केला आहे.

गुरुवारी (१९ फेब्रुवारी) ट्रम्प यांनी जाहीर केले की, यूएफओ, एलियन जीवन आणि अज्ञात आकाशीय घटना (UAP) यासंबंधित सरकारी फाइल्स शोधून सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले जाणार आहेत. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर लिहिले, “या विषयाबाबत प्रचंड उत्सुकता पाहता मी संबंधित विभागांना एलियन व परग्रह जीवन, अज्ञात आकाशीय घटना (UAP), अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स (UFO) आणि या अत्यंत गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या विषयाशी संबंधित सर्व सरकारी कागदपत्रे शोधून जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देणार आहे.”

ओबामांवर गंभीर आरोप

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर निशाणा साधला. "त्यांनी गोपनीय माहिती बाहेर काढली. त्यांना तसे करण्याचा अधिकार नाही. त्यांनी मोठी चूक केली," असे ट्रम्प म्हणाले. तथापि, ओबामांनी नेमकी कोणती माहिती उघड केली, याचा तपशील ट्रम्प यांनी दिला नाही. मात्र, ओबामांनी अलीकडेच एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे हा वाद निर्माण झाल्याचा त्यांचा दावा आहे.

मुलाखतीत काय म्हणाले ओबामा?

गेल्या शनिवारी एका पॉडकास्टमध्ये होस्ट ब्रायन टायलर कोहेन यांनी ओबामांना “एलियन खरे आहेत का?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर ओबामांनी उत्तर दिले, “ते खरे आहेत, पण मी त्यांना पाहिलेले नाही आणि त्यांना एरिया ५१ मध्येही लपवलेले नाही". पुढे बोलताना, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपासून काही लपवून ठेवलेलं एखादं मोठं कटकारस्थान नसेल, तर कोणतीही गुप्त भूमिगत सुविधा अस्तित्वात नाही” असेही ते म्हणाले.

नेवाडा राज्यातील एरिया ५१ हा हवाई दलाचा गोपनीय तळ असून, तेथे परग्रहवासीयांवर प्रयोग होत असल्याच्या अफवा अनेक वर्षांपासून आहेत. मात्र २०१३ मध्ये सीआयएच्या अवर्गीकृत कागदपत्रांनुसार, या ठिकाणी प्रगत गुप्तचर विमानांची चाचणी केली जात होती.

ओबामांची स्पष्टोक्ती

वाद वाढल्यानंतर ओबामांनी स्पष्ट केले की, मुलाखतीतील त्यांचे वक्तव्य हे “स्पीड राउंड” या हलक्या-फुलक्या प्रश्नोत्तर सत्राच्या अनुषंगाने केले होते. विश्वाच्या अफाट विस्ताराचा विचार करता पृथ्वीबाहेर जीवन असण्याची शक्यता सांख्यिकदृष्ट्या नाकारता येत नाही, असेही त्यांनी मान्य केले; मात्र आपल्या अध्यक्षीय कार्यकाळात परग्रहवासीयांनी पृथ्वीशी संपर्क साधल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “माझ्या अध्यक्षीय कार्यकाळात परग्रहवासीयांनी संपर्क साधल्याचा कोणताही पुरावा मला आढळला नाही. खरंच नाही!”

ट्रम्प यांची प्रतिक्रिया

ट्रम्प यांनी गुरुवारी एअर फोर्स वन विमानातून पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी एलियनविषयी काही पुरावे दिसले आहेत का, असा प्रश्न विचारला असता, “ते खरे आहेत की नाही, मला माहिती नाही.” असे ते म्हणाले.

राजकीय संघर्ष आणि एलियन्सबाबत चर्चा पुन्हा सुरू झाल्या असल्या, तरी अधिकृत अमेरिकन अहवालांनुसार एलियन संपर्काचा कोणताही पडताळलेला पुरावा अद्याप समोर आलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in