भारतावर ‘टॅरिफ बॉम्ब’! अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याची ट्रम्प यांची घोषणा; एकूण कर ५० टक्क्यांवर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २४ तासांत आणखी कर लादण्याची धमकी मंगळवारी दिली होती. ती खरी करत बुधवारी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली.
भारतावर ‘टॅरिफ बॉम्ब’! अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याची ट्रम्प यांची घोषणा; एकूण कर ५० टक्क्यांवर
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २४ तासांत आणखी कर लादण्याची धमकी मंगळवारी दिली होती. ती खरी करत बुधवारी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त कर लादण्याची घोषणा केली. यासंबंधीच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. हा आदेश २१ दिवसांनी म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या या नव्या आदेशामुळे अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के ‘टॅरिफ’ लावल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा भारतीय अर्थव्यस्थेला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

यापूर्वी त्यांनी ३० जुलैला भारतावर २५% कर लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली होती. ‘भारत रशियाशी व्यापार करून युक्रेनविरुद्ध रशियन युद्धयंत्रणेला खतपाणी घालत आहे. त्यामुळे भारतावर ही कारवाई करण्यात आली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत निर्णयांचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या टॅरिफ धोरणांचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या मुद्यांवरून डोनाल्ड ट्रम्प हे आक्रमक झाले आहेत. या मु्द्यांवरून ट्रम्प सातत्याने भारतावर टीका करत आहेत.

ट्रम्प यांनी आपल्या कार्यकारी आदेशात काय म्हटलेय?

भारत सरकार रशियाकडून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तेल आयात करत आहे. अशा परिस्थितीत, अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीय वस्तूंवर २५% अतिरिक्त कर लागू होईल. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत जसे की जर कोणताही माल आधीच समुद्रात भरला गेला असेल आणि मार्गावर असेल किंवा तो विशिष्ट तारखेपूर्वी अमेरिकेत पोहोचला असेल तर या करातून सूट दिली जाईल. मार्च २०२२ च्या सुरुवातीला, अमेरिकेने रशियन तेल आणि संबंधित उत्पादनांच्या त्यांच्या देशात आयातीवर पूर्णपणे बंदी घालणारा आदेश जारी केला होता. मात्र, आता ट्रम्प प्रशासनाला असे आढळून आले आहे की, भारत ते रशियन तेल खरेदी करत आहे, ज्यामुळे रशियाला आर्थिक मदत होत आहे. यामुळे, आता अमेरिकेने भारतावर हा नवीन कर लादण्याचा निर्णय घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in