
बीजिंग : अमेरिकेने चीनवर लादलेल्या १२५ टक्के आयात कराचे पडसाद आता दोन्ही देशांत उमटू लागले आहेत. चीनने अमेरिकन चित्रपटांची आयात कमी केली आहे. ‘अमेरिकेसोबत खुल्या संवादाला चीन तयार आहे. पण, हा संवाद सन्मानाने झाला पाहिजे’, असे चीनने स्पष्ट केले आहे.
चीन व अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे चिनी जनतेत चिंता निर्माण झाली आहे. चीन चित्रपट प्रशासनाने सांगितले की, अमेरिकेने चीनवर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ लावले आहे. चिनी नागरिकांमध्ये अमेरिकन चित्रपटांची क्रेझ आहे. पण, बाजारपेठेची गणिते लक्षात घेऊन आम्ही अमेरिकन चित्रपटांची आयात कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनच्या व्यापार खात्याचे प्रवक्ते हे याँगक्वॉन म्हणाले की, चीन खुल्या चर्चेला तयार आहे. पण, दोन्ही देशांतील संवाद हा सन्मानाने झाला पाहिजे. व्यापार युद्ध तीव्र झाल्यास चीन अखेरपर्यंत लढेल, असा इशारा त्यांनी दिला.
दबाव, धमक्या व ब्लॅकमेलिंग हा चीनशी व्यवहार करण्याचा मार्ग नव्हे. आम्हाला आशा आहे की, दोन्ही देश एकमेकांना भेटतील आणि परस्पर आदर, शांततापूर्ण सहअस्तित्व आणि सहकार्याच्या तत्त्वांनुसार संवाद आणि सल्लामसलत करून मतभेद सोडवण्यासाठी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे चीनच्या ४३८ अब्ज डॉलरच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे, तर चीनच्या ८४ टक्के टॅरिफमुळे १४३ अब्ज डॉलरच्या अमेरिकन निर्यातीला फटका बसणार आहे. अमेरिकेचे ‘टॅरिफ’ हे संपूर्ण जगाभोवती आहेत. पण, तो केवळ चीनला लावला जात असल्याचा आभास निर्माण केला जात आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान - डब्ल्यूटीओ
अमेरिकेने चीनवर लादलेले १२५ टक्के टॅरिफ आणि चीनने अमेरिकेवर लादलेल्या ८४ टक्के टॅरिफमुळे जगभरात व्यापार युद्धाला सुरुवात झाली आहे.
जागतिक व्यापारात ३ टक्के वाटा असलेल्या अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे जागतिक आर्थिक अर्थव्यवस्थेला गंभीर नुकसान होऊ शकते, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेचे नागोझी ओकंजो-इवेला यांनी दिला.
आम्ही घाबरणारे किंवा माघार घेणारे नाही - चीन
आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास घाबरणार नाही किंवा माघारही घेणार नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. याचवेळी चीनच्या परराष्ट्र खात्याने जुना व्हिडीओ प्रसारित केला आहे.
युरोपियन महासंघाकडूनही टॅरिफला ९० दिवसांची स्थगिती
अमेरिकेने चीनव्यतिरिक्त अन्य देशांवरील टॅरिफला ९० दिवसांची स्थगिती दिली आहे. अमेरिेकेच्या या निर्णयानंतर युरोपियन महासंघानेही अमेरिकेवर लागू केलेल्या टॅरिफला ९० दिवसांची स्थगिती दिली. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे युरोपियन महासंघाने सांगितले.