
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर आकारणीवरून जगाला दिलेला इशारा अखेर अंमलात आणला आहे. जगातील जवळपास १०० देशांवर ट्रम्प यांनी ‘जशास तसा’ (टॅरिफ) कर लावला आहे. त्यांनी भारतावर २७ टक्के कर लावला आहे. अमेरिकेच्या या ‘कर’भाराविरोधात जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
अमेरिकेने भारतावर २७ टक्के, चीनवर ३४ टक्के,युरोपियन महासंघावर २० टक्के, दक्षिण कोरिया २५ टक्के, जपानवर २४ टक्के, व्हिएतनामवर ४६ टक्के आणि तैवानवर ३२ टक्के कर लावला आहे. अमेरिकेने ६० देशांवर त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या टॅरिफच्या तुलनेत अर्धे टॅरिफ लावले आहे. तसेच दुसऱ्या देशांकडून अमेरिकेत येणाऱ्या सर्व सामानावर १० टक्के ‘टॅरिफ’ लावला आहे.
परदेशात बनणाऱ्या वाहनांवर २५ टक्के कर लागणार आहे. यापूर्वी अमेरिका अन्य देशांच्या दुचाकीवर केवळ २.४ टक्के कर लावत होता, तर भारत व व्हिएतनाम हे अनुक्रमे ६० व ७० टक्के कर लावत आहेत. आतापर्यंत अमेरिकेला यांनी लुटले आता हे संपणार आहे, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिका सर्वात श्रीमंत बनणार
अमेरिका आता जगातील कोणत्याही देशांपेक्षा श्रीमंत बनणार आहे. आज आम्ही अमेरिकेच्या कामगारांसाठी उभे आहोत. कारण आम्ही ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण लागू करत आहोत. आता आम्ही अधिक श्रीमंत होऊ शकतो. आमच्याकडे इतका पैसा वाढेल की तुम्हाला ते अविश्वसनीय वाटेल, असे ते म्हणाले.
अमेरिकेत उत्पादन करा!
कोणत्याही कंपनीला करापासून वाचायचे असल्यास तुम्ही अमेरिकेत आपली उत्पादने तयार करा. ज्यांना अमेरिकन बाजार हवा असेल त्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. या करातूनच अमेरिकेचा विकास होईल, असे ते म्हणाले. अनेकांनी अमेरिकन बाजाराचा फायदा घेऊन स्वत:ला श्रीमंत केले. ते आता अमेरिकन वस्तूंवर आपल्या बाजारात कठोर धोरण राबवत आहेत. आता अमेरिका आपल्या फायद्याचे धोरण राबवणार आहे. नोकरी व कारखाने पुन्हा अमेरिकेतील येतील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
अमेरिकेला आम्हाला पुन्हा महान बनवायचे आहे. त्यामुळेच आम्ही ‘जशास तशा’ कराची घोषणा करत आहोत. याचाच अर्थ आमच्यावर जो देश जेवढा कर लावेल, तितकाच कर आम्ही त्यांच्यावर लावणार आहोत, असे अमेरिकेने जाहीर केले.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचे काळजीपूर्वक मूल्यांकन - भारत
भारताच्या व्यापार व उद्योग खात्याने सांगितले की, अमेरिकन अध्यक्षांनी केलेल्या घोषणांचे काळजीपूर्वक मूल्यांकन आम्ही करत आहोत. विकसित भारताचा दृष्टिकोन लक्षात घेऊन भारतीय उद्योग व निर्यातदारांसह सर्व भागधारकांच्या आम्ही संपर्कात आहोत. टॅरिफबाबत त्यांची प्रतिक्रिया घेत आहोत. तसेच अमेरिकन व्यापार धोरणात झालेल्या बदलांमुळे निर्माण झालेल्या संधीचा अभ्यास करत आहोत.
भारताच्या कोणत्या क्षेत्रावर परिणाम होणार?
अमेरिकेच्या नवीन करांमुळे १४ अब्ज डॉलरचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र व ९ अब्ज डॉलरच्या रत्न व आभूषणे क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो. वाहनांचे सुटे भाग व ॲॅल्युमिनियम उत्पादनांवर हा कर लागू नसेल. यापूर्वी ट्रम्प यांनी या उत्पादनावर २५ टक्के कर लावला आहे. भारताच्या वाहन, रत्न व दागिने, रसायन व औषधे, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादकांवर अमेरिका सध्या १.०५ टक्के, २.१२ टक्के, १.०६ टक्के व ०.४१ टक्के कर लावतो.
व्हाईट हाऊसने सांगितले की, औषधी उत्पादनांना या करातून तात्पुरती सवलत दिली आहे. तसेच ऊर्जा उत्पादनांवर कर सवलत मिळाली आहे.
जगभरातून तीव्र प्रतिक्रिया
अमेरिकेच्या कराविरोधात चीन, इंग्लंड, इटली, दक्षिण कोरिया आदी देशांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. चीनने सांगितले की, अमेरिकेचे नवे कर धोरण चुकीचे असून त्याला आम्ही ठामपणे विरोध करणार आहोत. आमच्या हितरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल उपाययोजना केल्या जातील. अमेरिकेची कर घोषणा ही आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या मानदंडाचे उल्लंघन आहे. यामुळे देशोदेशींच्या वैध अधिकारांचे नुकसान होणार आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. व्यापार युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेसोबत तडजोड करण्याच्या दिशेने काम केले जाईल, असे त्या म्हणाल्या.
युरोपियन महासंघाचे वॉन डेर लेयेन म्हणाले की, जगावर कर लावण्याच्या ट्रम्प यांच्या घोषणेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसणार आहे. यातून अनिश्चितता वाढून संरक्षणवाद वाढेल. याचे मोठे परिणाम जगावर होतील.
आयर्लंडचे पंतप्रधान मायकल मार्टिन म्हणाले की, अमेरिकेचा निर्णय दु:खदायक आहे. या करांमुळे कोणालाही फायदा मिळणार नाही. आयर्लंडच्या नोकऱ्यांचे संरक्षण करण्यास माझी प्राथमिकता असेल.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन म्हणाले की, हा निर्णय युरोपसाठी कठीण असेल. तसेच हा निर्णय अमेरिका व त्यांच्या नागरिकांसाठीही नुकसानकारक ठरेल.
१० टक्के टॅरिफची अंमलबजावणी ५ एप्रिलपासून, तर ‘जशास तशा’ कराची अंमलबजावणी ९ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता सुरू होणार आहे.
टॅरिफबाबत भारत खूप कडक देश आहे. मोदी आपले मित्र असले तरी ‘टॅरिफ’बाबत त्यांचे वर्तन योग्य नाही, असे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकन अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होणार - रघुराम राजन
ट्रम्प प्रशासनाने जगातील अनेक देशांवर लावलेल्या करांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होणार आहे. भारतावर त्याचा किरकोळ परिणाम होईल, असे प्रतिपादन जागतिक अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी केले. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला याचा प्रथम फटका बसेल. जसा फुटबॉलपटू स्वत:च्याच गोलपोस्टमध्ये गोल करतो. तेच काम अमेरिकेने केले आहे. भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर कर वाढल्याने अमेरिकन ग्राहकांना माल महाग मिळणार आहे. त्यामुळे मागणी कमी होईल, असे राजन म्हणाले.